पानठेलावाल्यावर हल्याप्रकरणी ३ आरोपी अटकेत

नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून एका पानठेल्यावर दुकानदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र कळमना पोलिसांनी तत्पर कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे बोगदा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. ‘महफिल’ नावाच्या पानठेल्यावर हा संपूर्ण प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, मोहन नावाचे दुकानदार या ठिकाणी चहा आणि पानठेला चालवतात. रात्रीच्या सुमारास रोहित, सिद्धेश्वर यादव आणि विशाल हे तिघे चहा पिण्यासाठी त्यांच्या ठेल्यावर आले होते. चहा पित असताना या तिघांमध्ये आपापसातच जोरदार वाद सुरू झाला. परिस्थिती चिघळू नये म्हणून दुकानदार मोहन यांनी मध्यस्थी करत त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यावेळी आरोपी तिथून निघून गेले.
मात्र काही वेळातच हे तिघे पुन्हा ठेल्यावर परतले आणि त्यांनी थेट मोहन यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत त्यांनी अचानक हल्ला चढवला. आरोपींनी हातातील लाकडी काठ्या आणि चहाच्या जड भांड्यांनी मोहन यांच्या डोक्यावर जबर मारहाण केली. या हल्ल्यात मोहन गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. इतक्यावरच आरोपी थांबले नाहीत, तर त्यांनी ठेल्यातील साहित्याचीही तोडफोड करत मोठे नुकसान केले.
घटनेनंतर स्थानिकांनी जखमी मोहन यांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करत तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी रोहित, सिद्धेश्वर यादव आणि विशाल या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे शहरातील रात्रीच्या वेळी चालणाऱ्या टपऱ्या आणि छोट्या व्यवसायांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कळमना पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपी गजाआड झाले असले, तरी अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.



