मन्न की बात’मध्ये पंतप्रधान मोदींचा संदेश; इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाने एकजूट राहण्याचे आवाहन

नवी दिल्ली (प्रतिनिधी):
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन्न की बात’च्या १३२व्या भागातून देशवासीयांना संबोधित करत इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत या आव्हानांचा ठामपणे सामना करत असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच, या कठीण काळात सर्वांनी एकजूट राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारत आपल्या मजबूत आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे, विविध देशांकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे आणि गेल्या दशकात उभारलेल्या क्षमतांमुळे या आव्हानांना ठामपणे तोंड देत आहे.”
ते पुढे म्हणाले की, ज्या प्रदेशात सध्या युद्ध सुरू आहे, तो भारताच्या ऊर्जा गरजांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण होत आहे. या घडामोडींवर भारत बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या संघर्षाचा परिणाम लाखो भारतीय कुटुंबांवर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. विशेषतः पश्चिम आशियातील देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीय नागरिकांची चिंता लक्षात घेऊन सरकार आवश्यक ती पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी देशवासीयांना संयम, एकजूट आणि सकारात्मकता राखण्याचे आवाहन करत, “आपण सर्व मिळून या संकटावर मात करू,” असा विश्वास व्यक्त केला.



