सावंगा विठोबा यात्रा उत्साहात; संस्थानच्या नियोजनाचे कौतुक, प्रशासनावर सुविधांकडे दुर्लक्ष केल्याची टीका

चांदूर रेल्वे (प्रतिनिधी):
चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थानचा गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान होणारा यात्रा महोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांनी यात्रेला हजेरी लावली. महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही सुमारे ४ ते ५ लाख भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते.
या यशस्वी आयोजनाचे श्रेय संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या उत्कृष्ट नियोजनाला दिले जात आहे. भाविकांसाठी रस्त्यापासून मंदिरापर्यंत सावलीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सीसीटीव्ही सुरक्षा, शिस्तबद्ध दर्शन रांगा तसेच भव्य महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला.
मात्र, दुसरीकडे प्रशासनाच्या सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर भगोले यांनी केली आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था, नदीवरील पुलावर कठड्यांचा अभाव आणि अपुरी प्रशासकीय व्यवस्था यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे यांनीही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याची नाराजी व्यक्त केली.
यात्रेनिमित्त सेवा देणाऱ्या स्वयंसेवकांचा आणि देवबहिणींचा सन्मान करण्यात आला. तसेच अवधूत नाम प्रचारिका रेखा गायकवाड यांच्या प्रवचनाने कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
दरम्यान, “संस्थानचे नियोजन कौतुकास्पद असले, तरी भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे,” अशी मागणी व्यक्त होत आहे.



