citynewsJalgaonLatest NewsMaharashtra

रावेर शहर राममय; भव्य शोभायात्रेत रामभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

रावेर (प्रतिनिधी):
राम नवमीच्या पावन पर्वानिमित्त जळगाव जिल्ह्यातील रावेर शहर अक्षरशः राममय झाले होते. भव्य शोभायात्रा, डिजिटल बॅण्ड, सजविलेले रथ आणि फुलांच्या वर्षावात निघालेल्या मिरवणुकीत रामभक्तांचा महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.

“सर पे यज्ञमुकुट सजे… रामजी की निकली सवारी…” या भक्तिरसाने ओथंबलेल्या जयघोषात प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. राम नवमीच्या निमित्ताने शहरातील प्रत्येक चौकात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण शहर रामनामाच्या गजराने दुमदुमून गेले होते.

सायंकाळी श्री महालक्ष्मी माता मंदिराजवळ अयोध्याधाम निवासी महंत लक्ष्मणदास महाराज यांच्या हस्ते शोभायात्रेतील श्रीराम मूर्तीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर डिजिटल बॅण्ड, आकर्षक देखावे, सजविलेले रथ आणि पालखी यांच्या सह शोभायात्रेला भव्य सुरुवात झाली.

शहरातील मुख्य मार्गांवर नागरिकांनी ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करून शोभायात्रेचे उत्साहात स्वागत केले. मोठ्या संख्येने रामभक्त सहभागी झाल्यामुळे संपूर्ण रावेर शहर ‘राममय’ झाल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान, शहरातील प्रमुख राम मंदिरांना आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास करण्यात आली होती. दिवसभर मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने गजबजून गेला होता.

या उत्सवासाठी प्रशासनानेही चोख व्यवस्था ठेवली होती. तहसीलदार मेघा जेधे यांनी स्वतः मिरवणुकीवर लक्ष ठेवले, तर पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल आणि त्यांच्या पथकाने उत्कृष्ट बंदोबस्त ठेवला.

एकूणच, रावेरमध्ये राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला असून शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button