यूपीमध्ये भीषण अपघात; दोन ट्रकांची समोरासमोर धडक, तिघांचा जळून मृत्यू

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला असून, दोन ट्रकांच्या समोरासमोर धडकेनंतर लागलेल्या आगीत तिघांचा जळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना मटौंध पोलीस ठाणे हद्दीतील मुंडेरी मोड येथे, बांदा-महोबा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन ट्रकांची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि त्यानंतर दोन्ही वाहनांना भीषण आग लागली.
या आगीत ट्रकमध्ये अडकलेल्या चालक सुरेश पांडेय (वय ५५), सूरज नाथ उर्फ साधू (वय ४३) आणि खलाशी सनी (वय २८) यांचा जिवंत जळून मृत्यू झाला. तर अभिषेक यादव (वय २३) हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावरील वेग आणि निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.



