मालेगाव राममय; रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेची जय्यत तयारी

मालेगाव शहरात रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण शहर भगव्या रंगात न्हाऊन निघाले आहे. शहरभर भगवे ध्वज, पताका आणि बॅनर्स लावून भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात आले आहे.
रामनवमी निमित्त शहरातील प्रमुख रस्त्यांवर सजावट करण्यात आली असून ठिकठिकाणी श्रीराम जन्मोत्सवाचे फलक लावण्यात आले आहेत. शिव चौक येथील राम मंदिर परिसरात विशेष आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसरात भव्य भगवे ध्वज लावण्यात आले असून रंगीबेरंगी रोषणाईमुळे परिसर अधिकच उजळून निघाला आहे.
आज सायंकाळी रामनवमीच्या निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असून पारंपरिक ढोल-ताशे, लेझीम पथक आणि विविध देखावे हे मुख्य आकर्षण असणार आहेत.
या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि स्थानिक मंडळांकडून सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
एकूणच, रामनवमी निमित्त मालेगाव शहरात उत्साह आणि भक्तीचा संगम पाहायला मिळत असून आजच्या भव्य शोभायात्रेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



