हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर रनियन यांचे निधन; कर्करोगाशी झुंज देत वयाच्या 65 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन सृष्टीतील एक तेजस्वी तारा कायमचा मावळला आहे. जेनिफर रनियन यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर त्यांनी 6 मार्च 2026 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जेनिफर रनियन यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली. कुटुंबीयांनी लिहिले की, “गेल्या शुक्रवारी रात्री आमची लाडकी जेनिफर आम्हाला सोडून गेली. तिचा हा प्रवास खूप कठीण होता. तिने दिलेलं प्रेम, मैत्री आणि कुटुंबासाठी असलेली आपुलकी कायम स्मरणात राहील.”
दरम्यान, अभिनेत्रीची जवळची मैत्रीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री एरिन मर्फी यांनीही जेनिफरच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, जेनिफर कर्करोगाशी झुंज देत होती, मात्र अखेरीस ही झुंज अपयशी ठरली. एरिन मर्फी यांनी जेनिफरसोबतचा फोटो शेअर करत भावनिक शब्दांत श्रद्धांजली वाहिली.
‘घोस्टबस्टर्स’ या प्रसिद्ध हॉरर-कॉमेडी चित्रपटातून जेनिफर रनियन यांना विशेष ओळख मिळाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन इव्हान रीटमन यांनी केले होते, तर बिल मरे, डॅन आयक्रॉइड आणि हॅरोल्ड रॅमिस यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट त्या काळातील लोकप्रिय विनोदी चित्रपटांपैकी एक मानला जातो.
जेनिफर रनियन यांनी 1980 आणि 1990 च्या दशकात टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. लोकप्रिय सिटकॉम ‘चार्ल्स इन चार्ज’ मध्ये त्यांनी ‘ग्वेंडोलिन पियर्स’ ही भूमिका साकारली होती. तसेच ‘अनदर वर्ल्ड’ या मालिकेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका केली.
याशिवाय ‘क्वांटम लीप’ आणि ‘मर्डर, शी रोट’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी पाहुण्या कलाकार म्हणून काम केले होते.
जेनिफर रनियन यांच्या निधनामुळे हॉलिवूडने एक प्रतिभावान अभिनेत्री गमावली आहे. त्यांच्या अभिनयाची छाप आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका चाहत्यांच्या स्मरणात कायम राहणार आहेत.



