agriculturecitynewsLatest NewsMaharashtraWashim

वाशिममध्ये चिया पिकाच्या दरात घसरण; क्विंटलमागे सुमारे हजार रुपयांची घट, शेतकरी चिंतेत

वाशिम :
नाविन्यपूर्ण आणि पोषणमूल्यांनी समृद्ध म्हणून ओळख मिळवलेल्या चिया पिकाच्या दरात वाशिम जिल्ह्यात अचानक घसरण झाल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या आठवडाभरात चियाच्या दरात क्विंटलमागे सुमारे एक हजार रुपयांची घट झाली असून त्यामुळे चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

गेल्या काही वर्षांत वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून चियाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जाणाऱ्या चिया बियाण्याला बाजारातही चांगली मागणी असल्याने अनेक शेतकरी या पिकाकडे वळले आहेत.

काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये चियाला १६ हजार ते १७ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत होता. मात्र गेल्या आठवडाभरात या दरात घसरण होऊ लागली असून सध्या चियाला सरासरी १५ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळत आहे. म्हणजेच अल्प कालावधीत क्विंटलमागे जवळपास एक हजार रुपयांची घट झाल्याचे दिसून येत आहे.

दरातील या घसरणीमुळे चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. याचबरोबर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरातही घसरण होत असल्याचे चित्र दिसत आहे.


दरातील ही घसरण पुढेही सुरू राहणार की बाजारभाव पुन्हा वाढणार, याकडे आता चिया उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. बाजारभाव स्थिर राहावेत आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button