गोठ्यात बैल धुताना विजेचा धक्का; कोल्हापुरात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुपरी-इंगळी रस्त्यावर बुधवारी (४ मार्च) संध्याकाळी विजेचा तीव्र धक्का लागून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोठ्यात बैल व म्हशी धुत असताना वाहन सर्व्हिसिंग मशीनमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हुपरी येथील खेमलापुरे यांच्या सुमारे शंभर जनावरांच्या मोठ्या गोठ्यात नेहमीप्रमाणे संध्याकाळी जनावरे धुण्याचे काम सुरू होते. यावेळी खेमलापुरे यांचे भाचे धीरज सहदेव नाईक आणि कामगार भगवान खंडू सोनवणे हे वाहन सर्व्हिसिंग मशीनच्या सहाय्याने बैल व म्हशी धुत होते.
दरम्यान अचानक मशीनमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने दोघांनाही जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने गोठ्याकडे धाव घेतली आणि दोघांनाही उपचारासाठी हुपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये भगवान खंडू सोनवणे आणि धीरज सहदेव नाईक यांचा समावेश आहे. दरम्यान, रात्री उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.



