पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाद्वारे आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन

अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाद्वारे आंतर विभागीय क्रिकेट टूर्नामेंटचे यशस्वी आयोजन विद्यापीठ क्रिकेट मैदानावर करण्यात आले. एम.पी.एड. विद्यार्थ्यांच्या वतीने नुकतीच ही स्पर्धा पार पडली.
पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमांतर्गत ‘मॅनेजमेंट’ या विषयामध्ये ‘मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन’ हा घटक आहे. या विषयाच्या प्रात्यक्षिक अनुभवासाठी विद्यापीठ स्तरावर शैक्षणिक विभागीय क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शैक्षणिक विभागातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक अशा एकूण १३ संघांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
अंतिम सामन्याचा निकाल: स्पर्धेचा अंतिम सामना ‘नॉन-टीचिंग’ संघ आणि ‘पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग’ यांच्यात झाला. यामध्ये पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाने विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
वैयक्तिक पारितोषिके:
- बेस्ट फलंदाज: आशु ठाकूर (नॉन-टीचिंग संघ)
- बेस्ट गोलंदाज व मॅन ऑफ द सिरीज: आरीफ भट (पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग)
समारोप व मार्गदर्शन: कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून विभाग प्रमुख डॉ. तनुजा राऊत उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयीन जीवनातील मेहनतीचे महत्त्व सांगतानाच, ही मेहनत भावी आयुष्यात कशी उपयोगी येते, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, शारीरिक हालचालींचे महत्त्व पटवून देत खेळाडूंना प्रोत्साहित केले. यांनी “खेळासाठी वय हा फक्त एक आकडा आहे,” असे म्हणत सर्वांना खेळामध्ये सहभागी होत राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनीषा कोडापे लाभल्या होत्या. तसेच भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. संदीप वाघुळे यांची विशेष उपस्थिती होती.
नियोजन व आभार: कार्यक्रमाची सांगता दोन खेळाडूंनी व्यक्त केलेल्या मनोगताने झाली. प्रांज्वल ढोके यांनी स्पर्धेचा संपूर्ण अहवाल सादर केला. सूत्रसंचालन रुपेंदर ढकाल आणि मीनल बोडखे यांनी केले. स्पर्धेसाठी पंच म्हणून हर्ष रायना, मीनल बोडखे, निखिल डोंगरे, राहुल राई, अजय कुमार आणि अनिता राय यांनी काम पाहिले.
याप्रसंगी डॉ. हेमंतराज कावरे, डॉ. अतुल बिजवे, डॉ. विजय निमकर, कु. सविता बावनथडे, डॉ. निलेश इंगोले, डॉ. सौरभ त्रिपाठी आणि विभागातील सर्व शिक्षकगण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शीतल देवी यांनी केले.



