BhandaraCrime NewsLatest News

महादेवाच्या मूर्तीची विटंबना करणारा आरोपी अखेर अटक

भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील भावड गावात घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेचा अखेर छडा लागला आहे. भगवान महादेवाच्या मूर्तीची निर्घृण विटंबना करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. धार्मिक भावना दुखावणाऱ्या या कृत्यावर अड्याळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील भावड गावात १६ ते १७ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली होती. भावड येथील प्राचीन महादेव मंदिरातील भगवान महादेवाच्या मूर्तीची अज्ञात इसमाने निर्घृण विटंबना केली. मूर्तीचे दोन्ही हात आणि तोंड तोडण्यात आल्याने सकाळी ही घटना उघडकीस येताच संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली. धार्मिक भावना दुखावणाऱ्या या कृत्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी अड्याळ पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम २९८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार अड्याळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची एकूण सात विशेष पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान संशयाची सुई गावातीलच ज्ञानेश्वर शामदेव चिचमलकर, वय ४२, याच्याकडे वळली. घटनेनंतर तो अचानक बेपत्ता झाल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही तपासणी आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला. भंडारा बसस्थानक परिसरात आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पोलिसी चौकशीत आरोपीने भावड येथील महादेव मूर्तीची विटंबना केल्याची कबुली दिली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी भावड परिसरातून जोर धरू लागली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button