अमरावती महापालिका: काँग्रेसच्या १५ नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार!
अमरावती: अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर विजय मिळवलेल्या १५ नगरसेवक व नगरसेविकांचा भव्य सत्कार सोहळा गुरुवारी, २२ जानेवारी २०२६ रोजी दिमाखात संपन्न झाला. हॉटेल प्राईम पार्क येथे अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विजयाचा जल्लोष आणि भविष्यातील विकासाचा संकल्प पाहायला मिळाला.
दिग्गजांची उपस्थिती
या सत्कार समारोहाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष बबलु शेखावत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, माजी महापौर अशोक डोंगरे, प्रदेश सचिव आसिफ तवक्कल आणि प्रदेश सचिव हाजी नजीर खान बी.के. यांची उपस्थिती होती.
धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय: डॉ. सुनील देशमुख
नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करताना डॉ. सुनील देशमुख म्हणाले की, “ही निवडणूक अत्यंत कठीण होती. धनशक्ती आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करून तुम्ही विजय मिळवला आहे. आता अमरावती शहराला अधिक सुंदर आणि विकसित करण्यासाठी नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करा.”
अन्यायाविरुद्धचा लढा सुरूच राहील: बबलु शेखावत
शहराध्यक्ष बबलु शेखावत यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाने नेहमीच अन्यायाविरुद्ध लढा दिला आहे. निवडणुकीत जनतेला दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सर्व नगरसेवकांनी महापालिका सभागृहात प्रभावीपणे आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.
महिला आणि सर्वसमावेशक नेतृत्वावर भर
माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी नमूद केले की, निवडून आलेल्या १५ सदस्यांमध्ये महिलांचे मोठे प्रमाण आणि सर्व समाजांचे प्रतिनिधित्व ही काँग्रेसची मोठी शक्ती आहे. तर विलास इंगोले यांनी शहरातील ज्वलंत प्रश्नांवर सतत संघर्ष करण्यासाठी तत्पर राहण्याचा सल्ला नवनियुक्त सदस्यांना दिला.
विकासासाठी एकजूट
या सत्कार सोहळ्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या हितासाठी आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्व १५ नगरसेवक एकजुटीने कार्य करतील, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.



