नांदेड महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

नांदेड :
नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही ऑडिओ क्लिप माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण तसेच माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येत असून, मात्र या ऑडिओची कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
व्हायरल होत असलेली ही ऑडिओ क्लिप नांदेड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ – इतवारा–मदीनानगर या मुस्लिमबहुल प्रभागातील उमेदवारी पॅनल तयार करण्यासंदर्भात असल्याचा दावा केला जात आहे. या कथित ऑडिओमध्ये इच्छुक उमेदवाराशी मोबाईल फोनवरून संवाद साधल्याचे ऐकू येते.
ऑडिओमध्ये इच्छुक उमेदवाराकडून पॅनलमध्ये मुस्लिम उमेदवारालाही संधी द्यावी असा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र त्यावर उत्तर देताना, “आपल्याला मुस्लिम उमेदवार नको, हिंदूंचं पॅनल बनवू” असे वक्तव्य केल्याचा दावा या ऑडिओत करण्यात येत आहे. तसेच उमेदवारीसाठी लागणाऱ्या खर्चाबाबत इच्छुक उमेदवाराने असमर्थता दर्शवल्यानंतर, “खर्चाची संपूर्ण जबाबदारी पक्ष सांभाळेल, तुम्ही फक्त नावे द्या” असेही या संभाषणात म्हटल्याचा उल्लेख आहे.
या कथित संभाषणात अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला अशा विविध प्रवर्गांमधून पॅनल तयार करण्याबाबत चर्चा झाल्याचेही समोर येत आहे. तसेच संबंधित प्रभागात भाजपला अपेक्षित उमेदवार मिळत नसल्याची चर्चाही या ऑडिओत असल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण आणि माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्याशी संबंधित असल्याचा दावा होत असलेल्या या ऑडिओ क्लिपमुळे नांदेडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, हा ऑडिओ खरा आहे की बनावट, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा पुष्टी संबंधितांकडून देण्यात आलेली नाही. प्रशासन व राजकीय पक्ष याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



