पोस्टल मतमोजणीला सुरुवात

सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू; निकालांची उत्सुकता शिगेला
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू करण्यात आली असून, त्यातून निकालांची प्रारंभिक दिशा ठरणार आहे.
मतमोजणीच्या प्रक्रियेला वेग आला असून, काही वेळातच प्राथमिक निकाल समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, विविध पक्षांच्या नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.
या निवडणुकांमध्ये राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोस्टल मतांच्या निकालांनंतर ईव्हीएमद्वारे मतदानाची मोजणी केली जाणार असून, त्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शांततेत निकाल प्रक्रिया पार पडत असल्याची माहिती देण्यात आली आहे.



