अवैध गॅरेज-गोडावुनमुळे मोरबाग–मसानगंज परिसर त्रस्त; नागरिकांचा प्रशासनाविरोधात आक्रोश

अमरावती, दि. — :
अमरावती शहरातील मोरबाग–मसानगंज परिसरातील अरुण होस्टेल रोडवर सुरू असलेल्या अवैध गॅरेज आणि गोडावुनमुळे स्थानिक नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य झाले आहे. या रस्त्यावर सतत उभ्या असणाऱ्या ट्रक व जड वाहनांमुळे शाळकरी विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असून, यासंदर्भात संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.
मोरबाग–मसानगंज भागातील अरुण होस्टेल रोड हा पूर्णतः निवासी परिसर आहे. मात्र नियमबाह्य पद्धतीने येथे गॅरेज व मोठ्या प्रमाणावर गोडावुन सुरू असून, त्याठिकाणी येणाऱ्या जड वाहनांमुळे परिसरात वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्यावर बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी ये-जा करतात. रस्त्याच्या मधोमध उभे असलेले ट्रक कधीही जीवघेण्या अपघातास कारणीभूत ठरू शकतात, अशी भीती पालक व्यक्त करत आहेत.
महानगरपालिकेने या परिसरात सार्वजनिक नळ बसवले असून, पाणी भरण्यासाठी महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याच रस्त्याने जावे लागते. मात्र ट्रक चालकांकडून होणारी अरेरावी, अश्लील भाषेचा वापर आणि बेजबाबदार वर्तनामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दवाखान्यात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांनाही उभ्या ट्रकांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.
नागरिकांच्या माहितीनुसार दररोज सुमारे ६० ते ७० ट्रक या रस्त्यावर येतात आणि अनेक दिवस रस्त्यावरच उभे राहतात. नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधत १८ जानेवारी २००५ रोजी पारित झालेल्या महानगरपालिकेच्या ठराव क्रमांक १९२ची आठवण करून दिली आहे. या ठरावानुसार निवासी परिसरातील गॅरेज व गोडावुन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आजतागायत या ठरावाची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या परिसरात यापूर्वीही दोन निष्पाप बालकांचा ट्रक अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली असून, तरीदेखील प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वेळीच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर परिसरातील शांतता व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.



