मालेगाव शहरात अवैद्य सावकारीचा धोकादायक पद्धतीने वाढता व्यापार; नागरिकांची चिंता

वाशिम / संदीप भातुडकर – मालेगाव शहरात अवैद्य सावकारीचा ‘खंटी’ व्यवसाय जोर धरत असून, गरीब आणि लघु व्यावसायिक लोक याच्या जाळ्यात अडकत आहेत. सावकार किमान ३० ते ४५ रुपये प्रति शेकडा व्याज दराने पैसे उकळत असून, अनेकांना आर्थिक संकटात ढकलले आहे.
राज्य शासनाने अवैद्य सावकारी कायदा अमलात आणला असला तरी प्रत्यक्ष कारवाई न झाल्यामुळे या व्यवसायाला अधिक बळ मिळत आहे. ग्रामीण भागातही ‘खंटी’ व्यवसायाचा प्रचंड वाढ झाल्याचे दिसत असून, कमी उत्पन्न असलेल्या लोकांना आकर्षित करून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवले जात आहे.
मालेगाव शहरातील एका वीज वितरण कंपनीतील वायरमन कर्मचारी उदाहरण म्हणून समोर आला आहे. त्याने फक्त ८ हजार रुपये उधार घेतले असताना, ८ लाख रुपयांपर्यंत व्याजाची रक्कम भरावी लागली. शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाचा नातेवाईक असलेल्या या पीडिताने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या तो दारोदर फिरत आहे आणि या सावकारी पाशामुळे त्याचे जीवन अडचणीत आले आहे.
सावकारी ग्रस्त नागरिकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. मालेगाव तालुक्यातील अवैद्य सावकारी व्यवसाय वाढत चालल्याने, प्रशासनाची बेपरवाही अनेकांना गंभीर आर्थिक आणि मानसिक संकटात टाकत आहे.



