बालविवाह कायद्याने गुन्हा! अमरावती ग्रामीण पोलिसांचे गंभीर आवाहन अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्यांवर कठोर कारवाई

अमरावती ग्रामीण/चांदुर रेल्वे : समाजात आजही रूढ असलेल्या काही जुन्या आणि कालबाह्य धार्मिक चालीरीतींमुळे अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह होत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस येत आहेत. नुकतेच चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत एका बालविवाहाचे प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे एका 19 वर्षीय महिलेला दुसऱ्या प्रसूतीला सामोरे जावे लागले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कठोर पाऊल उचलत सज्ञान पतीला अटक केली आहे.
या पार्श्वभूमीवर, अमरावती ग्रामीण पोलिसांनी सर्व नागरिकांना बालविवाह थांबवण्याबाबत आणि कायद्याचे पालन करण्याबाबत जाहीर आणि गंभीर आवाहन केले आहे. बालविवाह प्रकरणी पतीला अटक; पोलीस स्टेशन चांदुर रेल्वेत गुन्हा दाखल चांदुर रेल्वे, जि. अमरावती: दिनांक 06/12/2025 रोजी उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथे 19 वर्षीय पीडित महिलेची द्वितीय प्रसूती झाली आणि तिने एका स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला. या महिलेला यापूर्वी दोन वर्षांची एक मुलगी आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, या महिलेचा विवाह सन 2021 मध्ये, म्हणजे ती अल्पवयीन असतानाच धार्मिक चालीरीतीनुसार करण्यात आला होता.
या गंभीर माहितीची नोंद घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ स्थानिक मोर्शी पोलीस स्टेशनला माहिती दिली. या प्रकरणी, बालविवाह करून अल्पवयात वैवाहिक संबंधांतून दोन मुली जन्माला घालण्याच्या कारणावरून पीडितेच्या सज्ञान पती (वय 25 वर्ष, रा. चांदुर रेल्वे) याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे येथे अपराध क्रमांक 645/2025 कलम 376 (2)(एन) भादंवी सहकलम 04, 06 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (POCSO Act) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीतास तातडीने अटक केली आहे. उच्चाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास या दाखल गुन्ह्याचा पुढील तपास विशाल आनंद सो. (पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण), पंकज कुमावत सो. (अप्पर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण), आणि अनिल पवार सो. (उपविभागीय पोलीस अधिकारी, चांदुर रेल्वे) यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. अजय आकरे (ठाणेदार, पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे) यांच्या नेतृत्वाखाली श्रीमती विना पंडे (महिला पोलीस उपनिरीक्षक) आणि नंदलाल लंगोट (पोलीस उपनिरीक्षक) यांचे तपास पथक अधिक तपास करत आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांचे नागरिकांना गंभीर आवाहन पोलीस स्टेशन चांदुर रेल्वेच्या हद्दीतील सर्व नागरिकांना अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे:
“बालविवाह हा कायद्यानुसार पूर्णपणे निषिद्ध आहे आणि तो अल्पवयीन मुला-मुलींच्या शोषणास कारणीभूत ठरतो.” तपासामध्ये असे दिसून आले आहे की, विविध धर्म आणि जाती-पंथ यांच्या कालबाह्य चालीरीती, शैक्षणिक मागासलेपण किंवा अज्ञानातून अशाप्रकारे अल्पवयीन विवाह जुळवले जातात. यामुळे पीडित मुला-मुलींना शारीरिक त्रासासह कायदेविषयक मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. चेतावणी: कालबाह्य चालीरीती किंवा अज्ञानापोटी अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह करण्यात येऊ नयेत. अशाप्रकरणी सहभागी असलेल्या सर्व जबाबदार व्यक्तींना कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागेल. सहकार्याचे आवाहन: अशा घटनांची माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला द्यावी.
भागीदारी: बालविवाह आणि लैंगिक शोषणाविरुद्ध सर्व नागरिकांनी संयमाने आणि कायद्याच्या बाजूने उभे राहावे. अन्यथा, भविष्यात कठोर कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागेल, तसेच संबंधित अल्पवयीन मुला-मुलींच्या भविष्यावरही याचा विपरीत परिणाम होईल.



