Latest News

संविधान आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षक व अस्मितेचे प्रतीक होय : पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे

हिंदी विश्‍वविद्यालयात संविधान दिन साजरा
संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन व संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन

वर्धा, 26 नोव्हेंबर 2025 : संविधान हे आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षक आणि अस्मितेचे प्रतीक आहे असे प्रतिपादन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष, आयआयएम जम्मू व एनआयटी श्रीनगरचे अध्यक्ष तसेच इंडो-फ्रेंच सीईओ फोरमचे सदस्य पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांनी केले. ते महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात संविधान दिनानिमित्त आपले संविधान – आपला स्वाभिमान या अंतर्गत आणि संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने बुधवार, 26 नोव्हेंबर रोजी आयोजित ‘भारतीय संविधानाचे लोकशाहीतील योगदान’ या विषयावरील व्याख्यानात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा होत्या. यावेळी कुलसचिव कादर नवाज खान मंचावर उपस्थित होते.

पद्मश्री डॉ. कांबळे म्हणाले की संविधान दिन हा केवळ संविधानाचे स्मरण करण्याचा दिवस नाही, तर विविधतेने नटलेल्या देशाला एका धाग्यात बांधणाऱ्या त्या आत्म्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे. धर्म, भाषा, जात, परंपरा अशा विविधतेने व्यापलेल्या देशात संविधानाने सर्वांना समान अधिकार व सन्मानासह एकाच छताखाली उभे केले आहे. हा दिवस आपल्याला अभिमानासोबत आत्मपरीक्षण, उत्तरदायित्व आणि राष्ट्रनिर्मितीची नवी ऊर्जा प्रदान करतो. भारताचे संविधान हे जगातील सर्वांत विस्तृत, समावेशक आणि प्रगतिशील संविधानांपैकी एक आहे. ते केवळ कायद्यांचा दस्तऐवज नसून आपल्या अधिकारांचे संरक्षण करणारे, कर्तव्यांची प्रेरणा देणारे आणि लोकशाहीचे पावन मार्गदर्शक आहे. सामाजिक न्याय आणि समानतेच्या विस्ताराचा उल्लेख करताना त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, आरक्षण व्यवस्था, मूलभूत अधिकार यांसारख्या तरतुदींमुळे कोट्यवधी जनतेला सन्मान, शिक्षण आणि असंख्य संधी प्राप्त झाल्याचे सांगितले. मतदानाचा अधिकार असो वा शिक्षण, संपत्ती, विवाह, सुरक्षा या सर्व क्षेत्रांत संविधानाने महिलांना अग्रक्रमाने समानता दिली आहे. असे ते म्‍हणाले. भारतीय संविधानाचे लोकशाहीतील अद्वितीय योगदान अधोरेखित करताना डॉ. कांबळे म्हणाले की संविधानाच्‍या केंद्रस्थानी सर्वांसाठी न्याय आणि समानतेचा भाव आहे. त्यांनी आपल्या भाषणात निवडणूक आयोग, डिजिटल इंडिया, अर्थव्यवस्था, राष्ट्रीय शिक्षण धोरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही भाष्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालविलेल्या चवदार तळे आणि काळाराम मंदिर आंदोलनांचा उल्लेख करून सामाजिक समतेच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल होय असे स्‍पष्‍ट केले आणि डॉ. आंबेडकरांना लोकशाहीचे महान चॉम्पियन असे संबोधले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा म्हणाल्या की आजच्या दिवशी आपण डॉ. आंबेडकरांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो व त्यांना वंदन करतो. संविधान निर्मितीत त्यांच्या योगदानाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की संविधान प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांचे संरक्षण करते आणि देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवते. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार मूल्यांत संपूर्ण लोकशाहीचे सार अंतर्भूत आहे. संविधान कोणताही भेदभाव न करता मार्गदर्शन करते. त्याच्या सौंदर्याचे आकलन करून ते आचरणात आणणे आवश्यक आहे आणि अधिकारांसोबत कर्तव्यांविषयीही जागरूक राहिले पाहिजे असे त्‍या म्‍हणाल्‍या.

कुलगुरूंनी पद्मश्री डॉ. कांबळे यांचा शाल, स्मृतिचिन्ह, चरखा आणि सूतमाळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्‍ज्‍वलन व बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून झाली. कुलगीत सहायक प्राध्यापक डॉ. तेजस्वी एच. आर. व त्यांच्या समूहाने सादर केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. स्वागत विधी विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. जनार्दन कुमार तिवारी यांनी केले. मराठी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. संदीप सपकाळे यांनी संचालन केले तर अनुवाद अध्ययन विभागाच्या सहायक प्रोफेसर  डॉ. मीरा निचळे यांनी आभार मानले.

यानिमित्‍त विश्‍वविद्यालयाच्या विधी विभागाने पंजाब कॉलनीपर्यंत संविधान जनजागृती रॅली काढली. रॅलीचा शुभारंभ कुलगुरू प्रो. शर्मा यांनी केला. या प्रसंगी बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवनाच्या प्रांगणातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पद्मश्री डॉ. कांबळे व कुलगुरू प्रो. शर्मा यांनी पुष्पहार अर्पण केला. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिक्षक, शोधार्थी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button