Latest NewsMaharashtra

ऑपरेशन थंडर” अंतर्गत एम.डी. पावडरसह तरुण अटक

नागपूर शहर पोलिस आयुक्त श्री. रविंद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली “ऑपरेशन थंडर – एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया” ही मोहीम शहरभर राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत नंदनवन पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने एक मोठी कारवाई करत एम.डी. पावडर बाळगणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. ही घटना ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडली. नंदनवन पोलिसांचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना नंदनवन झोपडपट्टीत, गल्ली क्रमांक ३ समोर आमरस्त्यावर एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसला. त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव अर्पन उर्फ काल्या अमित मडावी, वय २५ वर्षे, रा. गर्जना चौक, नंदनवन झोपडपट्टी असे सांगितले. पोलिसांनी पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या खिशातून झिपलॉक पिशवीमध्ये ठेवलेली ४.९१ ग्रॅम एम.डी. पावडर मिळाली. आरोपीकडून एम.डी. पावडर आणि मोबाईल असा मिळून तब्बल ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हा आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार कलम ८ (क), २२ (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या पुढील तपास नंदनवन पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button