राष्ट्रीय महामार्गावर निकृष्ट पेव्हर ब्लॉकचा वापर – नागरिकांची तक्रार

माहूर – माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक 161 वरील कामावर पुन्हा एकदा वादाचे सावट निर्माण झाले आहे. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या महामार्गाच्या कासवगतीच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच, आता या रस्त्यालगत फूटपाथवर निकृष्ट दर्जाच्या पेव्हर ब्लॉकचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक इलियास बावानी यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे दाखल केली असून, निकृष्ट दर्जाचे दोन पेव्हर ब्लॉक नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. बावानी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, फूटपाथसाठी वापरलेले पेव्हर ब्लॉक अतिशय हलक्या दर्जाचे असून, काही दिवसांतच तुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या कामावर महामार्ग विभागाचे अधिकारी कधीही प्रत्यक्ष पाहणीस येत नाहीत, अशीही नागरिकांची तक्रार आहे. परिणामी, केवळ तीन वर्षांतच माहूर–किनवट महामार्गाच्या अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्याला भेगाही पडल्या आहेत. माहूर हे तीर्थक्षेत्र असल्याने आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कुलदैवत रेणुका माता माहूर येथेच असल्याने, या भागाला विशेष महत्त्व देऊन महामार्गाशी जोडण्यात आले होते. या कामासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला होता, तरीही ठेकेदाराने मुदत संपूनही काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. धनोडा मार्गाचे काम अद्याप अर्धवट स्थितीत आहे. वाहनधारकांना दररोज खड्ड्यांचा आणि धुळीचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच गुत्तेदाराने फूटपाथचे काम सुरू केले असले तरी त्यात निकृष्ट दर्जाच्या पेव्हर ब्लॉकचा वापर केल्याने या कामात गैरव्यवहार झाल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
बावानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या कामाची तपासणी करावी, अशी मागणी केली असून पेव्हर ब्लॉकचे गुणनियंत्रण तपासणीद्वारे परीक्षण करण्याची मागणीही केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माहूरसारख्या धार्मिक स्थळावर अशा निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे प्रशासनावर नागरिकांचा विश्वास डळमळीत होतो.



