अधिकारी हवा तर असा! वडिलांच्या निधनानंतरही पूरग्रस्तांच्या मदतीला धावले मैनाक घोष

धाराशिव : मराठवाडा आणि सोलापूर परिसरात आलेल्या महाप्रलयकारी पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेकडो कुटुंबं उघड्यावर आली असून, स्थानिक प्रशासन, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्था मदतीसाठी धडपडत आहेत. याच काळात एक अधिकारी आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत, साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे — धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मैनाक घोष.
विशेष बाब म्हणजे, वडिलांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी मैनाक घोष यांनी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतः ग्राउंडवर उतरून कार्य सुरू ठेवलं. पाझर तलावाची पातळी धोकादायक झाल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देत, पाहणी केली आणि तातडीने प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.
घोष यांच्या कार्यकर्तृत्वाचं सर्वत्र कौतुक होत असून, त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. जनतेच्या संकटात स्वतःला झोकून देणाऱ्या घोष यांनी प्रशासन कसं असावं याचं जिवंत उदाहरण उभं केलं आहे.
एकीकडे अधिकारी आपलं दुःख बाजूला ठेवून पूरग्रस्तांसाठी धडपडत असताना…
दुसऱ्या बाजूला धाराशिवचेच जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांचा २४ सप्टेंबर रोजी तुळजापुरातील एका सांस्कृतिक कार्यक्रमातील नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे. अनेक गावांमध्ये अजूनही पुराचे पाणी ओसरलेले नाही, लोकं उघड्यावर आहेत, आणि त्याचवेळी जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी कार्यक्रमात डान्स करताना दिसत असल्याने लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.
“ग्रामस्थ रडतायत, अधिकारी नाचतायत”, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावरून व्यक्त होत असून, प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कर्तव्यदक्षतेचं प्रतीक – मैनाक घोष यांचं उदाहरण प्रेरणादायी
पूराच्या पार्श्वभूमीवर मैनाक घोष यांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता आणि जबाबदारी केवळ प्रशंसनीयच नाही, तर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. संकटात लोकांच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे प्रशासनाचं खरं काम काय असावं, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे.
संकटाच्या काळात नेमकं कोण कसं वागतं, यावरच समाजाचा विश्वास आणि सत्ताधाऱ्यांची खरी परीक्षा होते, हे या दोन्ही घटनांमधून अधोरेखित झालं आहे.



