अतिविशिष्ट सेवा तत्त्वावरील डॉक्टरांची थकीत देयके अदा करण्यासाठी शासनाकडून ३ कोटी २१ लाख ९२ हजार इतका निधी वितरित

अमरावती ( प्रतिनिधी) दिनांक- २० सप्टेंबर :- विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे सेवा देणाऱ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांचे कोट्यवधींचे देयके थकीत असल्याने अतिविशिष्ट सेवा तत्त्वावरील डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या कारणास्तव विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथील आरोग्य सेवा ठप्प झाली असल्याने अनेक शल्यक्रिया प्रलंबित आहे. या प्रकरणाचा तिढा सोडवून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथील आरोग्य सेवा पूर्ववत करण्याला घेऊन आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी शासनाकडे पाठपुरावा केला असता याची फलश्रुती म्हणून आता शासनाकडून सुपर हॉस्पिटल मधील डॉक्टरांची थकीत देयके अदा करण्यासाठी ३ कोटी २१ लाख ९२ हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. याबाबत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रशासनाला सुद्धा शासनाने सूचित करून डॉक्टरांची देयके अदा करण्यासंदर्भात निर्देशित केले आहे. त्यामुळे आता लवकरच मागील एक -दीड महिन्यापासून रखडलेली आरोग्य सेवा सुरळीत होणार असल्याने त्याबद्दल आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना.प्रकाश आबीटकर यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.
अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे फेज -१ व फेज – २ च्या इमारती मध्ये किडनी रोग, किडनी ट्रान्सप्लांट , प्लास्टिक सर्जरी , हृदयरोग, मेंदूरोग व कँसर यासह अन्य जटिल आजारांची शस्त्रक्रिया व उपचार करण्यासाठी स्वतंत्र युनिट सुरु आहे. अमरावती विभागाबरोबरच धारणी -मेळघाट सारखे अनुसूचित क्षेत्र तसेच मध्यप्रदेशाच्या सीमाभागातून रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच शहरातील स्पेशालिस्ट डॉक्टर त्याठिकाणी अतिविशिष्ट सेवा म्ह्णून मानधनतत्त्वात सेवा देत असून आता पर्यंत रुग्णांवर अत्यंत जटिल आजारांच्या सुद्धा यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अलीकडच्या काळात सुपर हॉस्पिटल मध्ये अनेक अत्याधुनिक उपचार उपलब्ध झाल्याने रुग्णांना आरोग्य संजीवनी प्रदान झाली आहे. परंतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अतिविशिष्ट सेवा म्ह्णून कार्यरत तज्ज्ञ डॉक्टरांच्या मानधनाचा प्रश्न निर्माण झाल्याने डॉक्टरांनी संप पुकारला. त्यामुळे हॉस्पिटलची रुग्णसेवा रखडली असल्याने अनेक शस्त्रक्रिया सुद्धा प्रलंबित झाल्या आहेत.
दरम्यान आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी सुपर- हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली असता डॉक्टरांचे कोट्यवधींचे देयके प्रलंबित असल्याने त्यांनी यापुढील शस्त्रक्रिया न करण्याचे सांगून संप पुकारला असल्याचे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना.प्रकाश आबीटकर यांच्याकडे पाठपुरावा करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती करिता शासनाकडून मंजूर असलेला निधी वितरित करण्याची मागणी केली. सुपर हॉस्पिटल येथील अतिविशिष्ट सेवा तत्त्वावरील डॉक्टर संपावर असल्याने रुग्णसेवा कोलमडली असल्याची बाब सुद्धा आमदार महोदयांनी मंत्रीमहोदयांच्या प्रकर्षाने अवगत केली.
त्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती करिता निधी वितरित करण्याचे निर्देश वित्त विभागाला दिले असता , याबाबत शीघ्र कार्यवाही करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील डॉक्टरांचे थकीत मानधन अदाकरण्यासाठी ३ कोटी २१ लाख ९२ हजार कोटी कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर उर्वरित साधारणतः १ कोटींचा निधीची हा डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीत मंजूर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उपलब्ध झालेल्या या निधी अंतर्गत आता डॉक्टरांची थकीत देयके अदा करण्याबाबत सुद्धा यथाशीघ्र नियोजन करण्याचे निर्देशित करण्यात आल्याने आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या पुढाकाराने सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या संपाचा तिढा सुटला आहे.
अमरावतीच्या आरोग्य सेवांचा विस्तार व बळकटी देण्याला घेऊन शासनाकडून वेळोवेळी भरीव निधीची उपलब्धता होत असल्याने आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.



