Latest NewsMaharashtraNashik

नेपाळच्या पार्श्वभूमीवर ‘उठाव’विषयी पोस्ट; अभिनेता किरण माने अडचणीत, ABVP-भाजप आक्रमक, सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

नाशिक : ज्येष्ठ अभिनेते किरण माने आपल्या ठाम आणि परखड सामाजिक-राजकीय भूमिकांसाठी ओळखले जातात. मात्र यावेळी त्यांची एक फेसबुक पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पोस्टमुळे भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी नाशिकमधील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या पोस्टविरोधात गुन्हा दाखल करण्याची तसेच मानेंना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

किरण माने यांनी नेपाळमध्ये झालेल्या तरुणांच्या आंदोलनाचा संदर्भ देत फेसबुकवर भारतातही युवकांनी उठाव करावा, अशी टिप्पणी केली होती, असा आरोप आहे. त्यांच्या या पोस्टमुळे लोकशाही व्यवस्थेविरोधात चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा ABVP आणि भाजपकडून केला जात आहे.

ABVP-भाजप आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

ABVP च्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये जोरदार घोषणाबाजी करत किरण माने यांच्यावर गंभीर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत देशविरोधी आणि लोकशाहीविरोधी चिथावणी दिल्याचा आरोप केला आहे. यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपनेही जोरात लावून धरली आहे.

पोलिसांची प्राथमिक चौकशी सुरू

सायबर पोलिसांनी या तक्रारीची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. यामध्ये माने यांची पोस्ट देशविरोधी घटक कारवायांच्या कक्षेत येते का, याची तपासणी सुरू आहे. गुन्हा दाखल करायचा की नाही, यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

राजकीय वातावरण तापलं

या प्रकरणामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माने यांच्या पोस्टनंतर निर्माण झालेल्या संतप्त प्रतिक्रिया, घोषणाबाजी आणि पोलिसांत तक्रारीमुळे हा विषय केवळ सामाजिकच नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही संवेदनशील बनला आहे.

संपादकीय दृष्टिकोन: कलाकारांनी समाजातील प्रश्नांवर भाष्य करणे अपेक्षित असते. मात्र, सध्या निर्माण झालेल्या वातावरणात अशा प्रकारच्या पोस्ट्सना कोणत्या अर्थाने घेतले जाऊ शकते, याची जाणीव ठेवणे तितकेच गरजेचे आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button