जम्मूमध्ये भूस्खलन आणि पावसामुळे 8 जणांचा मृत्यू

जम्मू, हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या काही भागात गेल्या काही तासांपासून पाऊस सुरू आहे. जम्मूमध्ये भूस्खलन आणि पावसामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या पावसामुळे वैष्णो देवी यात्रेला स्थगिती देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ या ठिकाणी 22 जवानांची सुटका करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात चंदीगड-मनाली महामार्गाला मोठे नुकसान झाले असून पंजाबमधील शाळा 30 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वृत्तसंस्थेनी दिलेल्या माहितीनुसार जम्मूतील वैष्णो देवी मार्गावर भूस्खलनामुळे पाच जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाले आहे. कटऱ्याचे जिल्हाधिकारी पीयूष धोत्रा यांनी ANI ला सांगितले की बचावकार्य सुरू आहे. पाच मृतदेहांना कम्युनिटी हेल्थ सेंटरवर आणण्यात आले आहे. 10-11 जण जखमी असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.
भारतीय सेनेच्या व्हाईट नाइट कॉर्प्सने ट्विटरवर माहिती दिली आहे की तीन बचाव पथके कटरा आणि आजूबाजूच्या भागात पोहचली आहेत. एक पथक अर्धकुंवारी आणि कटरातील लोकांना मदत करत आहे. कटराहून ठकरा कोटकडे जाणाऱ्या भूस्खलन झाले आहे, त्या ठिकाणी मदत करण्यासाठी दुसरे पथक पोहचले आहे तर तिसरे पथक जोरियातील दक्षिण भागात बचावकार्य करत आहे.
जम्मूचे विभागीय आयुक्त राकेश कुमार यांनी सांगितले की वैष्णो देवी यात्रा आणि शिवखोडी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी भूस्खलन झाले आहे. 8-9 जखमींना वाचवण्यात यश आले असून त्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की जम्मू काश्मीरमध्ये वैष्णो देवी मार्गावर भूस्खलनामुळे झालेले मृत्यू अत्यंत दुःखद आहेत. या बाबतीत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन बचावकार्य करत आहे. त्या ठिकाणी NDRF च्या टीम पोहचल्या आहेत.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की “माता वैष्णो देवी मार्गावर भाविकांच्या मृत्यूचे बातमी ऐकून अतीव दुःख झाले. मी पीडित कुटुंबाच्या प्रति संवेदना व्यक्त करतो. ईश्वराला प्रार्थना करतो की दिवंगत आत्मांना शांतता लाभो.” अब्दुल्ला यांनी सांगितले की जम्मू एअर पोर्ट बंद असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना पोहचता आले नाही. बुधवारी सकाळी जम्मू येथे पोहचून परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
कठुआ या ठिकाणी बचाव पथकाने 25 जणांची सुटका केली आहे. त्यात 22 जवान आणि 3 नागरिकांचा समावेश आहे. पीटीआय सोबत बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की उशिरा रात्री आम्हाला कळलं की पाण्याची पातळी वाढली आहे. या ठिकाणी पुलाशी जोडला गेलेला भाग वाहून गेला आहे आणि त्यामुळे CRPF चे जवान अडकले आहेत. SDRF, NDRF आणि लष्कराने बचावकार्य करत या जवानांची सुटका केली.



