AmravatiLatest News

अमरावतीत पार्किंग, ट्राफिक सिग्नल आणि हॉकर्स झोनसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक — आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली आज शहरातील पार्किंग झोन, ट्राफिक सिग्नल आणि हॉकर्स झोन संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. वाढत्या वाहतूक समस्यांवर नियंत्रण मिळवणे आणि रस्त्यावरील अनधिकृत व्यवसायांना नियोजनबद्ध स्वरूप देणे या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत शहरातील प्रमुख भागांमध्ये पार्किंग झोन निश्चित करणे, हॉकर्स झोनसाठी योग्य जागांची निवड, त्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच नागरीक आणि स्थानिक व्यावसायिकांसाठी योग्य सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शहरासाठी पार्किंग व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा न होता नागरीकांना सोयीस्कर पार्किंग सुविधा मिळावी, यासाठी आधुनिक आणि कार्यक्षम यंत्रणा विकसित केली पाहिजे.”
त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि गर्दीच्या भागांमध्ये पार्किंगसाठी जागा निश्चित करून ‘पेड’ व ‘मोफत’ पार्किंग सुविधा विकसित करण्यात याव्यात. यासाठी ‘विकली व मंथली पास’ सुविधाही सुरू करण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभागानेही यात सक्रिय सहभाग घ्यावा.

हॉकर्स झोन संदर्भात आयुक्त म्हणाल्या, “रस्त्यावरील अनधिकृत व्यवसायांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अशा व्यवसायिकांना नियोजित आणि सुविधा-संपन्न जागा उपलब्ध करून दिल्यास नागरीक आणि व्यावसायिक दोघांनाही न्याय मिळेल.”
तसेच, झोन तयार करताना वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून संयुक्त कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले.
टोईंग व्हॅनच्या वापराबाबत आणि अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबतही यावेळी सविस्तर चर्चा झाली. हॉकर्सना विस्थापित न करता पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीस अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक, पोलीस उपायुक्‍त शाम घुगे, पोलीस उपायुक्‍त गणेश शिंदे, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर, पोलीस निरीक्षक प्रविण वांगे, पोलीस निरीक्षक सुनिल चव्‍हाण, पोलीस निरीक्षक रिता उईके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तुषार काळे, प्रकाश उमाळे, वाहतूक पोलीस निरीक्षक ज्‍योती विल्‍लेकर, शहर अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक संचालक नगर रचना घनश्‍याम वाघाडे, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, धनंजय शिंदे, पी.ओ. सबडिव्‍हीजन सनी जाधव, उपअभियंता सुहास चव्‍हाण, उद्यान अधिक्षक अजय विंचुरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता, ज्ञानेश्‍वर आगरकर, उपअभियंता श्रीरंग तायडे, राजेश आगरकर, शरद तिनखेडे, कनिष्‍ठ अभियंता चि.प्र. देशपांडे, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत घेतलेले निर्णय लवकरच अंमलात आणून अमरावती शहरात एक शिस्तबद्ध, सुटसुटीत व नागरीकाभिमुख वाहतूक व व्यवसायिक व्यवस्था निर्माण केली जाईल, असे संकेत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी यावेळी दिले. नागरीक व व्यावसायिक यांच्यात संवाद साधत, जनजागृती मोहिमेद्वारे सहभाग वाढवण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त झाला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button