अकोल्यात विद्युततार चोरीचा पर्दाफाश, ५ आरोपी अटकेत!

अकोला : अकोल्याच्या उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या विद्युततार चोरी प्रकरणाचा यशस्वी तपास करून स्थानिक गुन्हे शाखेने पाच आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींच्या ताब्यातून बोलेरो पिकअपसह चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून या कारवाईने अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर अंकुश बसण्याची शक्यता आहे.
फिर्यादी एम. के. खोहे यांनी उरळ पोलीस ठाण्यात विद्युततार चोरीबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवून गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला.
- अटक करण्यात आलेले आरोपी:
- मंगेश सुभाष जाधव
- विजयनाय मणीराम रोशन
- बाबुलाल राठोड
- दिपक मनोहर पवार
- एक अन्य साथीदार
तपासादरम्यान आरोपींनी पोलिसांसमोर दिली कबुली:
तपासादरम्यान आरोपींनी एकूण चार गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, मुख्य आरोपी मंगेश सुभाष जाधव याच्या नावावर असलेले बोलेरो पिकअप (MH-12 QW-2502) हे वाहन चोरीसाठी वापरण्यात आले होते. या वाहनाची अंदाजे किंमत ७ लाख रुपये असून, ते पोलिसांनी जप्त केले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, आणखी काही गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



