धारणी नगर पंचायतचा अभिनव उपक्रम : दुकानदारांना कापडी पिशव्यांचे वाटप, प्लास्टिक विरोधात निर्णायक पाऊल

धारणी : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने धारणी नगर पंचायतने एक पर्यावरणपूरक आणि जनजागृतीपूर्ण उपक्रम राबवत प्लास्टिक प्रदूषणावर निर्णायक आघाडी घेतली. शहरातील सर्व दुकानदारांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले असून, प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कडक बंदी लावण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
पर्यावरणासाठी कृती, केवळ घोषणा नव्हे!
नगर पंचायतचे मुख्याधिकारी राजेश माळी यांच्या नेतृत्वाखाली, आरोग्य निरीक्षक इरफान शेख, कार्यालयीन अधीक्षक अमीन शेख, मनीष उटाले, अभिजित मोकळे आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे विशेष पथक शहरातील प्रत्येक दुकानात गेले.
यावेळी छपाई केलेल्या कापडी पिशव्या दुकानदारांना मोफत वितरित करण्यात आल्या आणि प्लास्टिकचा पर्याय म्हणून याचा कसा प्रभावी वापर करता येईल, याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
प्लास्टिक वापरल्यास कारवाई:
नगर पंचायतने स्पष्ट इशारा दिला आहे की, “प्लास्टिक पिशव्या वापरताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल.”
हा उपक्रम धारणी शहराला प्लास्टिकमुक्त बनवण्याच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनीही मान्य केले आहे.
सामाजिक जबाबदारीची जाणीव:
हा उपक्रम केवळ पर्यावरण पूरक वातावरण तयार करण्यापुरता मर्यादित न राहता, स्थानिक नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना रुजवणारा ठरतो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
नगर पंचायतच्या या पुढाकारामुळे धारणी शहर लवकरच ‘प्लास्टिक मुक्त शहर’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



