सर्व चिकित्सा पद्धतींचे शिक्षण राज्यात उपलब्ध करून देणाऱ्या ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा’चे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री फडणवीस

नाशिक : महाराष्ट्रातील आरोग्य शिक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे ‘उत्कृष्टता केंद्रा’चे भूमिपूजन आणि ‘चक्र’ – सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी या अभिनव संकल्पनेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने राज्यात सर्व चिकित्सा पद्धतींचे शिक्षण सर्वदूर पोहोचवण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले आहे. या विद्यापीठाने केवळ शिक्षण नव्हे, तर संशोधन, नवउद्योजकता आणि आधुनिक आरोग्य धोरणे राबवण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.”
‘चक्र’ मॉडेल आणि ‘हब अँड स्पोक’ प्रणालीचा आरंभ
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘चक्र’ या हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित उपक्रमाचा उल्लेख करताना सांगितले की, “या माध्यमातून ट्रायबल हेल्थ, जेनेटिक केअर आणि जेनेटिक स्टडीज या महत्त्वाच्या क्षेत्रांवर केंद्रित संशोधन आणि सेवा पुरविण्याचे उद्दिष्ट आहे.”
IIM नागपूर आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ट्रायबल हेल्थ विषयावर विशेष कार्यक्रम राबवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
नवीन शिक्षण धोरणामुळे उद्योग व शिक्षण यामधील दरी कमी
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवे शिक्षण धोरण लागू झाल्यानंतर शिक्षणाची दृष्टी सकारात्मक झाली आहे. पूर्वी उद्योग आणि शिक्षण यामधील तफावत होती, मात्र आता अभ्यासक्रम उद्योगानुरूप होत आहेत,” असे फडणवीस म्हणाले.
यासोबतच, ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ ची संकल्पना विद्यापीठांना स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावते, असेही ते म्हणाले.
राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा शासनाचा संकल्प
राज्यातील आरोग्यसेवा बळकट करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री म्हणाले, “13 कोटी जनतेसाठी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब ₹5 लाखपर्यंत आरोग्य विमा कवच देण्यात आले आहे. यामधील 50% शस्त्रक्रिया राज्यातीलच संस्थांमध्ये व्हाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे.”
कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती
या भव्य कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, नरहरी झिरवाळ, विद्यापीठाचे कुलगुरू व विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.



