ज्वेलर्स दुकानात नोकरीच्या नावाखाली लाखोंचा सोनं चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

नागपूर : ज्वेलर्सच्या दुकानात नोकरी करण्याच्या बहाण्याने लाखोंचं सोनं चोरून पळ काढणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश नागपूर पोलिसांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांच्या बारकाईच्या तपासामुळे ही टोळी पोलिसांच्या जाळ्यात आली.
या प्रकरणात नागपुरातील एका प्रसिद्ध ज्वेलर्स दुकानात काम करणारा सचिन नावाचा युवक दुकानात एकटा असताना 9950 स्टॅम्प असलेला 55 ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा चोरून फरार झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी स्पष्टपणे दिसून आली. यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची सखोल चौकशी सुरू केली.
तांत्रिक तपासाच्या आधारे मुख्य आरोपी वैभव मालगावे याला कोल्हापूरच्या इचलकरंजी येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी उर्वरित आरोपींच्या मागावर कारवाई सुरू केली. चौकशीत उघड झालं की चोरलेलं सोनं वैभवने आपल्या मित्राला चेतन जाविर याला दिलं आणि त्याने ते आपल्या मोठ्या भावाकडे – जगन्नाथ प्रकाश जाविरकडे विक्रीसाठी सुपूर्द केलं.
पोलिसांनी जगन्नाथकडून ५ लाख ३० हजार २०० रुपयांचं सोनं जप्त केलं आहे. मात्र, चेतन जाविर आणि आणखी एक आरोपी प्रशांत मुळीक सध्या फरार असून, त्यांचा शोध सुरु आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ही एक संगठित गुन्हेगारी टोळी आहे. ही टोळी महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील ज्वेलर्स दुकानांमध्ये काम मिळवून संधी मिळताच चोरी करून फरार होते. या टोळीने याआधीही अनेक ठिकाणी अशी गुन्हेगारी केली असल्याची माहिती समोर येत आहे.
अटक केलेल्या वैभव मालगावेला पोलिस कोठडीत घेऊन पुढील तपास सुरू आहे. नागपूर पोलिसांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.



