Accident NewsLatest NewsMaharashtra
धावत्या एसटी बससमोर बाईक आल्याने भीषण अपघात, बस उलटली, बसमध्ये ४० प्रवासी

लातूर :- लातूर – नांदेड महामार्गावर नांदगाव पाटी येथे आज सकाळी एसटी बसचा भीषण अपघात झाला. अहमदपूरवरून लातूरकडे येणारी बस उलटल्याने हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, धावत्या बससमोर अचानक दुचाकीस्वार आल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्यावर उलटली.
या अपघातात बसमधील ४० ते ४२ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी ४ ते ५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
अपघातानंतर महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.



