Local NewsMaharashtra

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक बच्चु कडुंचे तरूणाईसोबत श्रीमान ‘रायगड’ दर्शन

शिवरायांच्या जीवनातील संघर्ष, दूरदृष्टी, व स्वराज्य स्थापनेमागील त्यांची मेहनत यावर बच्चु कडु यांनी युवकांना संबोधित करताना शिवरायांचे जीवन हे प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत “आजच्या तरुणाईने शिवरायांच्या स्वाभिमान, कष्ट आणि नेतृत्वाच्या गुणांचा आदर्श घेतला पाहिजे. देश आणि समाजासाठी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे,” असे विचार माजी राज्यमंत्री बच्चु कडु यांनी हिंदवी परिवार आयोजित हिवाळी मोहीम रायगड परिक्रमा ते तळागड या तीन दिवसीय मोहीमेच्या प्रारंभी युवकांना संबोधीत करताना केले. डॉ शिवरत्न शेटे व दुर्ग अभ्यासक श्रीकांत कासट यांच्या माध्यमातून हजारो युवक ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान रायगड परिक्रमा करत सहभागी झाले.

माजी राज्यमंत्री बच्चु कडु यांनी युवकांसोबत ऐतिहासिक रायगडावर आयोजित या कार्यक्रमात सहभागी झाले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिवरायांच्या पराक्रमाचा गौरव करत युवकांना प्रेरणा देणारे प्रबोधन केले.रायगड किल्ल्याला भेट देण्यासाठी महाराष्ट्रभरातून १००० हून अधिक युवक एकत्र आले होते. दौऱ्याची सुरुवात गडाच्या पायथ्याशी शिवरायांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करून झाली. यानंतर युवकांनी एकत्रितपणे गड चढत त्यानंतर गडावर शिवाजी महाराजांचा सिंहासन आसन असलेल्या जागेचे दर्शन घेण्यात आले. बच्चू कडू यांनी शिवरायांच्या प्रशासनातील पारदर्शकता, लोकाभिमुखता आणि तटस्थ विचारांची उदाहरणे देऊन युवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी पर्यावरण रक्षण, स्वच्छता, आणि ग्रामीण भागातील युवकांचे सक्षमीकरण,शिवरायांचे त्रिकालाबाधित धोरण, तटरक्षण, स्त्री सन्मान, शिवरायांचे अविश्रांत कार्यप्रणाली यातून आजच्या तरुणाने एक चांगला आदर्श घेऊन नव महाराष्ट्र निर्माण करावा. शैक्षणिक अडचणी, बेरोजगारी, आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाली. बच्चु कडु यांनी युवकांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला देत, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.दौऱ्याच्या शेवटी, गडावर स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. शिवरायांच्या वारसांचा सन्मान राखण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व बच्चू कडू यांनी युवकांच्या समोर मांडले.ही रायगडवारी केवळ ऐतिहासिक स्थळाला भेट देणे नव्हे, तर युवकांच्या मनात स्वराज्य, स्वाभिमान, आणि सामाजिक बांधिलकीचे बीज पेरण्यासाठी प्रभावी ठरली. बच्चु कडुंच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमामुळे युवकांमध्ये नवचैतन्य संचारले असून, शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.या दौऱ्यामुळे रायगडासारख्या ऐतिहासिक ठिकाणांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक बदलाची नवी दिशा मिळू शकते, हे सिद्ध झाले आहे. यावेळी बच्चु कडु, संजय गोमकाळे, उमेश कपाळे, गणेश उईके, मंगेश लेंडे, आकाश खुरद, मनोज भोजने, स्वप्नील मोहोड, वैभव करडीकर, अभिजीत ठाकरे, विशाल आवारे, विवेक सोसे, देवा कडु, हिंदुराज रोडे, आयुष खापरे, संकल्प अढाऊ, समर्थ धर्माळे व हिंदवी परिवार असंख्य सदस्य सहभागी झाले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button