राजकमल रेल्वे पूल बंद; दिशादर्शक फलकांचा अभाव, वाहनधारकांची तारांबळ!

बेलपुरा, राजापेठ, कंवरनगर, गोपालनगरकडे जाणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ; पोस्ट ऑफिस पार्सल केंद्राजवळून वाहनांना घ्यावे लागते माघारी वळण
अमरावती : अमरावती शहरातील राजकमल रेल्वे पुलाच्या कामामुळे बेलपुरा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, हा मार्ग बंद करताना पर्यायी रस्त्यांची माहिती देणारे दिशादर्शक फलक लावण्यात न आल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वे स्टेशनवरून बेलपुरा, राजापेठ, कंवरनगर आणि गोपालनगरकडे जाणाऱ्या नागरिकांना नेमका कोणता मार्ग निवडावा, असा प्रश्न पडत आहे. विशेषतः बाहेरगावाहून अमरावतीत येणाऱ्या प्रवाशांना या वाहतूक बदलाचा मोठा फटका बसत आहे.
राजकमल परिसरातील रेल्वे पुलाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर बेलपुरा मार्गावरील रेल्वे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पुलाच्या कामामुळे वाहतुकीत बदल करणे अपरिहार्य असले, तरी वाहनधारकांना पर्यायी मार्गांची माहिती देणेही तितकेच आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात पर्यायी मार्ग दाखवणारे स्पष्ट दिशादर्शक फलक नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
रेल्वे स्टेशनवरून बेलपुरा, राजापेठ, कंवरनगर आणि गोपालनगरकडे जाणारे अनेक वाहनधारक नेहमीच्या मार्गाने पुढे जातात. मात्र, पोस्ट ऑफिसच्या पार्सल केंद्राजवळ पोहोचल्यानंतर रस्ता बंद असल्याचे त्यांच्या लक्षात येते. त्यानंतर वाहन पुन्हा वळवून माघारी आणावे लागते. यामुळे वाहनधारकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे.
विशेष म्हणजे, रेल्वे पुलाच्या चारही बाजूंनी वाहतुकीत बदल करण्यात आले असतानाही दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पर्यायी मार्ग दर्शवणारे फलक दिसत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. स्थानिक नागरिकांना परिसराची माहिती असल्याने ते पर्यायी रस्त्यांचा शोध घेऊन मार्ग काढतात. मात्र, बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना कोणत्या दिशेने जायचे, याची माहिती नसल्याने त्यांची अधिकच तारांबळ उडत आहे.
वाहतूक नियोजनाची जबाबदारी नेमकी कोणाची?
राजकमल रेल्वे पुलाचे काम महारेलकडून सुरू असताना वाहतूक नियोजनाची आणि नागरिकांना पर्यायी मार्गांची माहिती देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित होत आहे. महारेलच्या कामावर नियंत्रण कोणाचे आणि वाहतूक बदलाबाबत नागरिकांना माहिती देण्याची जबाबदारी कोण पार पाडणार, असे प्रश्नही आता विचारले जात आहेत.
रेल्वे पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने रेल्वे स्टेशन परिसरासह पुलाच्या चारही बाजूंना ठळक दिशादर्शक फलक लावावेत. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्गांची स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



