citynewsNagpur graminramtek

रामटेकच्या ४५ व्या भव्य शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; आकर्षक झांक्यांनी वेधले नागरिकांचे लक्ष!

श्री गणेश अवताराच्या देखाव्याला एक लाखांचे विशेष पारितोषिक; चाचेरच्या छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या सामाजिक नाटिकेला द्वितीय क्रमांक

रामटेक, प्रतिनिधी अजय मेहरकुळे : नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे भारतीय जनसेवा मंडळाच्या वतीने आयोजित ४५ व्या भव्य शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धार्मिक उत्साह, सामाजिक प्रबोधन आणि सांस्कृतिक परंपरेचा सुरेख संगम असलेल्या या शोभायात्रेने संपूर्ण रामटेक नगरीचे लक्ष वेधून घेतले. विविध धार्मिक व सामाजिक देखावे, आकर्षक झांक्या, ट्रक-ट्रेलर, ट्रॅक्टर, पायदळ देखावे, सुंदर रांगोळ्या आणि भव्य स्वागतद्वारांमुळे संपूर्ण शहराला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

संत गोपालबाबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच अठरा भुजा गणेश मंदिरात महाआरती करून शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. संत गोपालबाबांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही परंपरा यंदा ४५ व्या वर्षातही तितक्याच उत्साहाने आणि भव्यतेने साजरी करण्यात आली. शोभायात्रेत सहभागी झालेल्या विविध मंडळांनी सादर केलेल्या देखाव्यांमधून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक विषयांवरही प्रभावी भाष्य करण्यात आले.

या शोभायात्रेतील श्री गणेश अवताराचा देखावा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. हा देखावा सादर करणारे मोहन कोठेकर यांना रामटेकचे समाजसेवक आकाश ढोबळे यांच्या वतीने एक लाख रुपयांचे विशेष पारितोषिक अर्थात स्टार पुरस्कार प्रदान करण्यात आला. देखाव्याच्या आकर्षक मांडणीचे आणि सादरीकरणाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

दरम्यान, छत्रपती युवा प्रतिष्ठान, चाचेर यांच्या वतीने सादर करण्यात आलेली ‘बाप मायेच्या सागर… लेकीच्या सुरक्षेसाठी बापाची धडपड!’ ही सामाजिक संदेश देणारी नाटिका विशेष चर्चेचा विषय ठरली. मुलींची सुरक्षा, त्यांच्याप्रती असलेली वडिलांची काळजी आणि लेकीवरील निःस्वार्थ प्रेम या संवेदनशील विषयाचे प्रभावी सादरीकरण या झांकीतून करण्यात आले. सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या देखाव्याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

शोभायात्रेच्या निमित्ताने ट्रक-ट्रेलर, ट्रॅक्टर, पायदळ झांक्या, स्वागतद्वार आणि रांगोळी स्पर्धांसाठी एकूण ५ लाख ५८ हजार ६५२ रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली होती. त्यामुळे विविध मंडळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवित आपापल्या कलाकृतींचे सादरीकरण केले. धार्मिक देखाव्यांसोबतच महिला सुरक्षा, सामाजिक जबाबदारी आणि कौटुंबिक नातेसंबंध यांसारख्या विषयांनाही झांक्यांमधून स्थान देण्यात आले.

या भव्य आयोजनासाठी भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, महासचिव डी. मल्लिकार्जुन रेड्डी, शोभायात्रा समितीचे अध्यक्ष राजेश किंमतकर, राहुल गंडरे, राहुल कोठेकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या शोभायात्रेला राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार कुपाल तुमाने, नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, तहसीलदार रमेश कोळपे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

एकूणच, संत गोपालबाबांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या ४५ वर्षांच्या परंपरेचे जतन करत रामटेकच्या भव्य शोभायात्रेने धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक प्रबोधनाचा संदेशही दिला. आकर्षक देखावे, लाखोंची पारितोषिके आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे यंदाची शोभायात्रा रामटेककरांच्या स्मरणात राहणारी ठरली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button