citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात हवाला व्यवहाराच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक; कोऱ्या नोटा देऊन आरोपींचा गंडा!

कमी दरात पैसे ट्रान्सफर करून देण्याचे आमिष; नितेश शर्मा अटकेत, राजस्थानमधील इतर आरोपींचा शोध सुरू

नागपूर : कमी दरात हवाला व्यवहाराच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करून देण्याचे आमिष दाखवत नागपुरात तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ट्रेडिंग आणि हवाला व्यवहाराच्या नावाखाली फिर्यादीकडून पैसे स्वीकारल्यानंतर प्रत्यक्ष रक्कम देण्याऐवजी त्यांना कोऱ्या नोटा देऊन फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी नितेश शर्मा नामक आरोपीला अटक केली असून, राजस्थानमध्ये वास्तव्यास असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यापासून अशा प्रकारे कमी दरात हवाला व्यवहार करून देण्याचे आमिष दाखवणारी टोळी नागपूर शहरात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणात केशवाणी नामक व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. कमी दरात हवाला मार्फत पैसे ट्रान्सफर करून देण्याचे आमिष आरोपींकडून दाखवण्यात आले होते. या व्यवहारावर विश्वास ठेवून फिर्यादीने आरोपींकडे ४० लाख रुपये सुपूर्द केले. मात्र, ठरल्याप्रमाणे प्रत्यक्ष रक्कम देण्याची वेळ आल्यानंतर आरोपींनी पैसे देण्याऐवजी कोऱ्या नोटा हातात दिल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणाची पोलिसांत तक्रार करण्यात आली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत नितेश शर्मा याला अटक केली आहे. या फसवणुकीत आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून, संबंधित आरोपी राजस्थानमध्ये राहत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे.

दरम्यान, प्राथमिक तपासात सप्टेंबर महिन्यापासून नागपूर शहरात कमी दरात हवाला व्यवहार करून देण्याचे आमिष दाखवणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ४० लाखांच्या या फसवणुकीव्यतिरिक्त शहरात अशाच प्रकारच्या आणखी घटना घडल्या आहेत का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी नागरिकांना पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. हवाला व्यवहाराच्या माध्यमातून पैसे पाठवूनही संबंधित व्यक्तीला प्रत्यक्ष रक्कम मिळाली नसेल किंवा कमी दरात पैसे ट्रान्सफर करून देण्याच्या आमिषाने कोणाची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button