AMCActionAmravaticitynewslatestnewss breakingnews

वालकट कंपाऊंड मार्गावर जेसीबीने खोदला मोठा खड्डा; वाहतूक विस्कळीत, नागरिक त्रस्त!

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ड्रेनेज कामासाठी खोदकाम केल्याची प्राथमिक माहिती; खड्ड्यात मलबा टाकून बॅरिकेड्स लावल्याने वाहनचालकांची कसरत

अमरावती : शहरातील वालकट कंपाऊंडकडे जाणाऱ्या मध्यवर्ती मार्गावर जेसीबीच्या साहाय्याने मोठा खड्डा खोदण्यात आल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नाल्याचे सांडपाणी बाहेर काढण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था करण्याच्या उद्देशाने हे खोदकाम करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, खोदलेल्या खड्ड्यात मलबा टाकून त्याभोवती बॅरिकेड्स लावण्यात आल्याने रस्त्यावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल या मार्गावर जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. ड्रेनेजच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी काम पूर्ण करण्याऐवजी खड्ड्यात मलबा भरून बॅरिकेड्स लावण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे रस्त्याचा बराचसा भाग वाहतुकीसाठी अडवला गेला असून वाहनांची ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत.

राजकमल चौक बंद; पर्यायी मार्गांवरही वाहतुकीचा ताण

एकीकडे राजकमल चौकातील सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. अशा परिस्थितीत वालकट कंपाऊंड मार्गावरील मध्यवर्ती भागातच मोठा खड्डा खोदून मलबा टाकण्यात आल्याने वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. आधीच पर्यायी मार्गांचा शोध घेणाऱ्या वाहनचालकांना आता या ठिकाणीही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

प्रशासनाचे लक्ष कधी जाणार? नागरिकांचा सवाल

ड्रेनेजचे काम नेमके कधी पूर्ण होणार? खोदलेला खड्डा तातडीने बुजवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार का? तसेच काम सुरू असताना वाहतुकीचे योग्य नियोजन का करण्यात आले नाही? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर विकासकामे करताना नागरिकांच्या दळणवळणाचा विचार करणे आवश्यक आहे. मात्र, एका बाजूला राजकमल चौकातील कामामुळे वाहतुकीवर परिणाम होत असताना दुसऱ्या बाजूला उड्डाणपुलालगतच्या मार्गावरही मलबा आणि बॅरिकेड्समुळे अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून काम पूर्ण करावे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button