पद्मावती धरणात बुडून सरपंच पुत्राचा दुर्दैवी मृत्यू; तीन तासांच्या शोधमोहिमेनंतर मृतदेह हाती

गावाची पाईपलाईन जोडण्यासाठी धरणात गेले होते मधुकर महाले; पोहताना दम लागल्याने पाण्यात बुडाल्याची घटना
बुलढाणा : जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पद्मावती धरणात बुडून मासरूळ येथील सरपंच पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मधुकर महाले असे मृत तरुणाचे नाव आहे. गावाच्या पाणीपुरवठ्याची पाईपलाईन जोडण्यासाठी ते सहकाऱ्यांसोबत धरण परिसरात गेले होते. मात्र, काम पूर्ण करून पोहत माघारी येत असताना मध्येच दम लागल्याने ते पाण्यात बुडाले.
मासरूळ गावाला पद्मावती धरणाच्या क्षेत्रातील विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, गावाची पाईपलाईन खराब झाल्याने ती दुरुस्त करून जोडण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यासाठी मधुकर महाले आणि त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य धरण परिसरात गेले होते. पाईपलाईन जोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मधुकर महाले पोहत माघारी येत होते. मात्र, प्रवासादरम्यान त्यांना दम लागल्याने ते पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच शोधमोहीम सुरू करण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांनी सुमारे तीन तास शोध घेतल्यानंतर रात्री उशिरा मधुकर महाले यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. या दुर्दैवी घटनेमुळे मासरूळ गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



