नागपूर-चंद्रपूर महामार्गावर डिझेल टँकरला भीषण आग; आगीचे उंचच उंच लोळ!

वरोरा येथील मालू पेट्रोल पंपासमोर पहाटे थरार; अचानक ब्रेक लावताच टँकर उलटला, अपघातानंतर लागली आग
वरोरा : नागपूर-चंद्रपूर महामार्गावर आज पहाटे डिझेल टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली. वरोरा शहरातील मालू पेट्रोल पंपासमोर हा थरारक अपघात झाला. टँकर चालकाने अचानक ब्रेक लावल्यानंतर टँकर रस्त्यावर उलटला आणि त्यानंतर काही क्षणांतच टँकरने पेट घेतला. आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केल्याने महामार्ग परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपूर-चंद्रपूर महामार्गावरून डिझेलने भरलेला टँकर जात असताना वरोरा येथील मालू पेट्रोल पंपासमोर चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे टँकरचा ताबा सुटून तो उलटला. या अपघातानंतर टँकरला अचानक आग लागली. डिझेल टँकर असल्याने आगीने काही वेळातच भीषण स्वरूप धारण केले.
टँकरमधून आगीचे मोठमोठे लोळ आकाशात उसळू लागले, तर परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पेट्रोल पंपाजवळच ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्येही मोठी घबराट पसरली.
डिझेल टँकरला लागलेल्या आगीची तीव्रता पाहता मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात होती. या घटनेमुळे नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या अपघातात जीवितहानी झाली आहे किंवा नाही, तसेच अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यात आली आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. अपघाताचे नेमके कारण आणि पुढील परिस्थितीबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.



