शेतकऱ्याच्या ३८ क्विंटल सोयाबीनवर चोरट्यांचा डल्ला!

टीनशेड फोडून लाखोंचा शेतमाल लंपास; रिसोड तालुक्यातील नंधाना शिवारातील घटना, शेतकरी बाबुराव बोरकर यांचे मोठे आर्थिक नुकसान
वाशिम : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशातच कष्टाने पिकवून साठवून ठेवलेल्या शेतमालावरही चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात उघडकीस आली आहे. नंधाना शिवारातील शेतात असलेल्या टीनशेडचे कुलूप फोडून चोरट्यांनी तब्बल ३८ क्विंटल सोयाबीनची पोती चोरून नेली. या चोरीमुळे शेतकरी बाबुराव बोरकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव बोरकर यांनी आपल्या शेतात असलेल्या टीनशेडमध्ये सोयाबीनची पोती साठवून ठेवली होती. मात्र, चोरट्यांनी संधी साधून टीनशेड फोडले आणि त्यामध्ये साठवलेली तब्बल ३८ क्विंटल सोयाबीनची पोती लंपास केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्पादन घटले, त्यात शेतमालाची चोरी!
यंदा वाशिम जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. वाढता शेतीखर्च आणि कमी उत्पादन यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आधीच कोलमडले आहे. अशा परिस्थितीत मोठ्या कष्टाने पिकवलेला आणि भविष्यातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी साठवून ठेवलेला शेतमाल चोरीला गेल्याने बोरकर यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
शेतमालाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शेतात साठवून ठेवलेला शेतमालही सुरक्षित नसल्याचे या घटनेतून समोर आले आहे. सोयाबीन चोरीच्या या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांचा शोध घेऊन चोरीला गेलेला शेतमाल परत मिळवून द्यावा आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आधी निसर्गाची अवकृपा आणि आता चोरट्यांचा फटका, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.



