Accident NewscitynewsJalgaonMaharashtra

धावत्या इलेक्ट्रिक स्कुटीला भीषण आग; पाच मिनिटांत गाडी जळून खाक!

महिलेने प्रसंगावधान राखत स्कुटीवरून मारली उडी; थोडक्यात बचावला जीव, नवीन वाहनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील घटना; ५२ ते ५५ हजारांची स्कुटी आगीत भस्मसात, कंपनीकडून नुकसानभरपाई देण्याची वाहनमालकाची मागणी

जळगाव : इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापरादरम्यान वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात धावत्या इलेक्ट्रिक स्कुटीला अचानक आग लागून ती अवघ्या पाच मिनिटांत जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, स्कुटीला आग लागल्याचे लक्षात येताच चालक महिलेने प्रसंगावधान राखत गाडीवरून उडी मारल्याने तिचा जीव थोडक्यात बचावला. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास खडकदेवळा खुर्द येथील शेतरस्त्यावर ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला याकूजा कंपनीची इलेक्ट्रिक स्कुटी घेऊन ढोर शेतरस्त्याने जात होती. सुभाष महादू ठाकरे यांच्या शेताजवळ पोहोचताच अचानक धावत्या स्कुटीने पेट घेतला. काही क्षणांतच आगीने संपूर्ण वाहनाला वेढले. गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच महिलेने क्षणाचाही विलंब न करता स्कुटीवरून उडी मारली आणि सुरक्षित अंतरावर धाव घेतली. तिच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अवघ्या पाच मिनिटांत संपूर्ण स्कुटी जळून खाक झाली. या घटनेत महिलेचा जीव वाचला असला, तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दीड वर्षांपूर्वीच केली होती स्कुटीची खरेदी

ही इलेक्ट्रिक स्कुटी महिलेचे पती ईश्वर लक्ष्मण तेली यांच्या वडिलांनी पाचोरा येथून खरेदी केली होती. त्यासाठी सुमारे ५२ ते ५५ हजार रुपये खर्च करण्यात आले होते. विशेष म्हणजे, वाहन खरेदी करून केवळ एक ते दीड वर्षांचाच कालावधी झाला होता. त्यामुळे तुलनेने नवीन असलेल्या इलेक्ट्रिक स्कुटीला अचानक आग लागल्याने वाहनमालक कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

शोरूमकडून निराशाजनक उत्तर मिळाल्याचा दावा

घटनेनंतर वाहनमालकाने संबंधित शोरूमशी संपर्क साधून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. मात्र, या गाडीचे आता काही होऊ शकत नाही, असे उत्तर शोरूमकडून मिळाल्याचा दावा वाहनमालकाने केला आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, वाहनाची तांत्रिक तपासणी करावी आणि झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बॅटरीचा दोष की वायरिंगमधील बिघाड?

दरम्यान, स्कुटीला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बॅटरीमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता की वायरिंगमधील दोषामुळे आग लागली, याबाबत अधिकृत तपासणी होणे आवश्यक आहे. संबंधित कंपनीने वाहनाची तपासणी करून आगीचे नेमके कारण स्पष्ट करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात असताना अशा घटनांमुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण होत आहे. नवीन वाहन खरेदी केल्यानंतरही अशा प्रकारची दुर्घटना घडत असेल, तर वाहनांची गुणवत्ता, बॅटरीची सुरक्षितता आणि विक्रीनंतरची सेवा याबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. आता संबंधित कंपनी या घटनेची दखल घेऊन वाहनमालकाला न्याय देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button