AMCActionAmravaticitynewslatestnewss breakingnews

महापौरांच्या दालनासमोर शहरातील कचरा टाकून भीम ब्रिगेडचे आंदोलन; मनपा प्रशासनाला दिला इशारा!

ही तर फक्त झलक, जिल्हाधिकारी कार्यालय अजून बाकी!’; शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवरून आक्रमक आंदोलन, आयुक्त आणि महापौरांच्या दालनात कचरा टाकून व्यक्त केला संताप

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरातील जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढिगारे आणि स्वच्छतेच्या प्रश्नावरून भीम ब्रिगेड संघटनेने आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन केले. शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचलेले असताना प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट महापालिकेत धडक दिली. यावेळी शहरातील जमा केलेला कचरा महापालिका आयुक्तांच्या दालनात तसेच महापौरांच्या दालनासमोर टाकून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

महापालिकेच्या आमसभेदरम्यान घडलेल्या या आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून, नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘यह सिर्फ झांकी है, अभी जिल्हाधिकारी कार्यालय बाकी है’ अशी घोषणा देत प्रशासनाला थेट इशारा दिला. महापालिका प्रशासनाने शहरातील कचरा तातडीने उचलून स्वच्छतेची व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

कचरा न उचलल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनाचा इशारा

यापुढेही शहरातील कचऱ्याची समस्या तातडीने सोडविण्यात आली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयात यापेक्षाही मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यासह तेथे कुत्रे सोडण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भीम ब्रिगेड संघटनेने दिला. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या स्वच्छतेच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, अशी भूमिका संघटनेने मांडली.

या आंदोलनात भीम ब्रिगेड संघटनेचे शिलेदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापालिका प्रशासनाच्या दालनातच कचरा टाकून करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता या आंदोलनानंतर महापालिका प्रशासन शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेच्या कामाला कितपत गती देते, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button