नागपुरात बांधकाम साहित्य चोरीचा ४८ तासांत छडा; दोघांना अटक

कोराडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; लोखंडी रॉड, रिंग आणि सहा चाकी ट्रकसह ३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बांधकामस्थळावरून लाखो रुपयांचे लोखंडी साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाचा कोराडी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी चोरीच्या साहित्याबरोबरच गुन्ह्यात वापरण्यात आलेला सहा चाकी ट्रक असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजताच्या दरम्यान कोराडी परिसरातील सेंट्रल इंडिया कॉलेज रिजनल ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर येथे बांधकाम सुरू होते. या बांधकामासाठी लागणारे लोखंडी साहित्य व स्क्रॅप यापूर्वीच घटनास्थळी आणून ठेवण्यात आले होते. मात्र, अज्ञात चोरट्यांनी संधी साधून हे साहित्य ट्रकमध्ये भरून चोरी केले. चोरी गेलेल्या साहित्याची किंमत अंदाजे ५ लाख रुपये असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती.
या प्रकरणी फिर्यादी वकार अहमद रियाज अहमद (वय ६०, रा. हंसापुरी, बापूजी आखाडा, नागपूर) यांनी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४८ वाजता कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अप. क्र. ५२६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोराडी पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. तब्बल १३० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पोलिसांनी चोरीस गेलेल्या साहित्याचा आणि संशयित ट्रकचा माग काढला. दरम्यान, गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरीचा माल आणि सहा चाकी ट्रक अशोक चौक परिसरात, पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एमएच २४/जे/५३१८ क्रमांकाचा सहा चाकी ट्रक शोधून काढला. ट्रकमध्ये चोरीचे लोखंडी साहित्य आणि स्क्रॅप आढळून आले. यावेळी ट्रकजवळ असलेल्या दोघांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे टिंकू रामप्रकाश शाहू (वय ३९, रा. अशोक नगर, कमल चौक, जनता वाडी, पाचपावली, नागपूर) आणि नावेद अरसलम बेग (वय ३०, रा. पार्वती नगर, पाणी टाकीजवळ, न्यू इंग्लिश स्कूलजवळ, कमलना, नागपूर) अशी सांगितली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी १६ एम.एम.चे ३३ लोखंडी रॉड, २४ एम.एम.चे ३२ लोखंडी रॉड, विविध आकाराचे कापलेले लोखंडी रॉड, बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी रिंग, अॅल्युमिनियम धातूचे दाराचे पल्ले तसेच गुन्ह्यात वापरलेला सहा चाकी टाटा कंपनीचा ट्रक असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त उत्तर विभाग विनिता साहू, पोलीस उपायुक्त परिमंडळ ६ रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोराडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत वपोनि गणेश धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक अंकित अंबेवार, पोलीस हवालदार नरेश खांबलकर, पोलीस शिपाई प्रताप शेळके, बबन वैद्य, धीरज कोरडे आणि अनिकेत चौधरी यांनी सहभाग घेतला.
विशेष म्हणजे, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत चोरीचा छडा लावत आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे बांधकामस्थळांवरील साहित्य चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या तपासाची प्रभावी भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.



