Accident Newscitynewsramtek

हेल्मेट घातलेले असतानाही भीषण अपघातात २१ वर्षीय युवकाचा मृत्यू; रामटेकजवळ भरधाव पिकअपची दुचाकीला धडक

नागरा तलावाजवळ मागून आलेल्या पिकअपने दुचाकीला उडविले; धडकेत हेल्मेट तुटून युवकाचा मृत्यू, अपघातानंतर चालक वाहनासह फरार

रामटेक, प्रतिनिधी अजय मेहरकुळे : नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ नागरा तलाव परिसरात भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २१ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रणय उमेश कोहपरे (वय २१, रा. बोंद्री, ता. मोहाडी, जि. भंडारा) असे मृत युवकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी प्रणयने हेल्मेट परिधान केले होते. मात्र, अपघाताची धडक इतकी जबरदस्त होती की हेल्मेट तुटून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रणय हा सावनेरजवळील येरणगाव येथे आईला सोडण्यासाठी गेला होता. तेथून तो दुचाकीने रामटेकमार्गे आपल्या बोंद्री गावाकडे परत जात होता. गुरुवारी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजताच्या दरम्यान राखी तलाव परिसरातील नागरा तलावाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे प्रणय दुचाकीसह रस्त्याच्या दुभाजकावर जोरात आदळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

अपघाताची तीव्रता एवढी होती की, प्रणयने डोक्याच्या संरक्षणासाठी हेल्मेट घातलेले असतानाही धडकेमुळे हेल्मेट तुटले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. अपघातानंतर पिकअप वाहनचालक घटनास्थळावर न थांबता वाहनासह पसार झाला.

दरम्यान, याच मार्गाने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनचालकाने माणुसकी दाखवत गंभीर जखमी अवस्थेतील प्रणयला तातडीने रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

फरार पिकअप चालकाचा शोध सुरू

अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या पिकअप चालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. भरधाव वाहनाच्या धडकेत एका तरुणाला जीव गमवावा लागल्याने परिसरातून संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत.

सिटी न्यूज | रामटेक प्रतिनिधी : अजय मेहरकुळे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button