देशभरातील वाहनचालकांचे बेमुदत ‘स्टिअरिंग सोडो’ आंदोलन; अंजनगाव सुर्जीमध्येही चालक रस्त्यावर!

१३ प्रमुख मागण्यांसाठी अकोट रोडवर वाहनचालक-मालकांचा एल्गार; राष्ट्रीय चालक सुरक्षा कायदा, पेन्शन, विमा आणि सन्मानजनक वेतनाची मागणी
अंजनगाव सुर्जी : वाहनचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १२ नोव्हेंबर २०२६ पासून देशभरात बेमुदत ‘स्टिअरिंग सोडो’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ऑल इंडिया ड्रायव्हर जॉइंट कमिटी आणि संपूर्ण भारत संघर्ष वाहन चालक-मालक युनियनच्या अंजनगाव सुर्जी शाखेच्या वतीने अकोट रोडवर हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने वाहनचालक आणि वाहनमालक सहभागी झाले असून, त्यांनी आपली वाहने थांबवून आंदोलनाला सुरुवात केली आहे.

वाहनचालकांनी आपल्या विविध समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकूण १३ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे देशात राष्ट्रीय चालक सुरक्षा कायदा लागू करण्यात यावा. अपघात, अटक किंवा ड्युटीदरम्यान होणाऱ्या कथित छळाच्या प्रसंगी वाहनचालकांना कायदेशीर संरक्षण मिळावे, अशी आंदोलकांची भूमिका आहे.

यासोबतच राष्ट्रीय चालक आयोग आणि प्रत्येक राज्यात स्वतंत्र राज्य चालक आयोग स्थापन करावा, चालकांसाठी कल्याण मंडळ निर्माण करावे, तसेच सक्तीचा अपघात विमा आणि जीवन विमा लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. चालकांना हेल्थ कार्ड देऊन कॅशलेस उपचारांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी आंदोलकांनी केली आहे.
वाढत्या वयात आर्थिक सुरक्षितता मिळावी यासाठी वयाच्या ५५ वर्षांनंतर चालकांना पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा देण्यात यावी, राष्ट्रीय महामार्गांवर चालकांसाठी विश्रामगृहे उभारण्यात यावीत, तसेच पोलीस आणि परिवहन विभागाकडून ड्युटीदरम्यान होणारा कथित छळ थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय चालकांना सन्मानजनक वेतन, योग्य भत्ते आणि ओव्हरटाईमचा मोबदला मिळावा, अपघात प्रकरणांमध्ये निष्पक्ष चौकशी व्हावी, चालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष योजना राबवावी आणि चालक कुटुंबांसाठी आर्थिक सहाय्य योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्त्याच्या कडेला होणाऱ्या अवैध वसुलीला आळा घालावा आणि देशभरातील वाहनचालकांना राष्ट्रीय स्तरावर डिजिटल कार्ड उपलब्ध करून द्यावे, या मागण्यांचाही आंदोलनात समावेश आहे.
दरम्यान, वाहनचालकांच्या या बेमुदत आंदोलनामुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. चालकांच्या १३ प्रमुख मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते आणि आंदोलन कधी संपुष्टात येते, याकडे आता वाहनचालकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिटी न्यूजसाठी अंजनगाव सुर्जी येथून प्रतिनिधी जावेद शाह.



