citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात नायलॉन मांजाचा साठा जप्त; बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल!

यशोधरानगर पोलिसांची विनोबा भावेनगरात कारवाई; ५६ मांजाचे कोन जप्त, ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

नागपूर : प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने विनोबा भावेनगर परिसरात छापा टाकून प्रतिबंधित नायलॉन मांजाचे तब्बल ५६ कोन जप्त केले. या कारवाईत ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास यशोधरानगर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत विनोबा भावेनगर परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विनोबा भावेनगर, गल्ली क्रमांक ४, प्लॉट क्रमांक २२९ येथे धाड टाकली.

यावेळी तुषार संजय वझे (वय २१) आणि संजय माणिकराव वझे (वय ५४) यांच्या ताब्यात प्रतिबंधित नायलॉन मांजाचे ५६ कोन आढळून आले. प्रत्येक कोनाची किंमत १२०० रुपये असून, एकूण ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात अप. क्रमांक १०५३/२०२६ अन्वये पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ व १५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.

नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी तसेच दुचाकीस्वारांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होतो. त्यामुळे प्रतिबंधित मांजाची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

यशोधरानगर पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button