AMCActionamravaticitynews

दिवाळीच्या सणात अमरावती अस्वच्छतेच्या विळख्यात; रस्त्यांवरील कचऱ्याच्या ढिगांवर माजी पालकमंत्री सुनील देशमुख संतप्त!

नागरिक एकमेकांना देताहेत सुख-समृद्धीच्या शुभेच्छा, मात्र शहरातील अस्वच्छतेमुळे दुर्गंधीचा त्रास; महानगरपालिकेने स्वच्छता व्यवस्थेकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी.

अमरावती : संपूर्ण शहरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असताना दुसरीकडे अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचल्याचे चित्र समोर आले आहे. सणासुदीच्या काळात शहर स्वच्छ आणि सुंदर असणे अपेक्षित असताना रस्त्यांवरील कचऱ्यामुळे नागरिकांना नाक मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. एकीकडे नागरिक एकमेकांना दिवाळीच्या सुख-समृद्धीच्या शुभेच्छा देत आहेत, तर दुसरीकडे शहरातील अस्वच्छतेचे वास्तव पाहून ही दिवाळी सुख-समृद्धीची कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दिवाळी हा स्वच्छता, प्रकाश आणि आनंदाचा सण म्हणून ओळखला जातो. घराघरांत स्वच्छता आणि सजावटीची तयारी सुरू असताना शहरातील सार्वजनिक रस्ते आणि परिसर मात्र कचऱ्याच्या ढिगांनी व्यापलेले दिसत आहेत. साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने विशेष स्वच्छता मोहीम राबविणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात स्वच्छतेचा प्रश्न कायम असल्याचे चित्र आहे.

या परिस्थितीवर अमरावतीचे माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या काळात नागरिकांना स्वच्छ वातावरण मिळणे आवश्यक असून रस्त्यांवरील कचऱ्याचे ढीग तातडीने हटविण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आता शहरातील अस्वच्छतेची दखल घेऊन महानगरपालिका प्रशासन कचरा संकलन, वाहतूक आणि रस्त्यांची नियमित स्वच्छता यासाठी कोणती पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बाईट : सुनील देशमुख – माजी पालकमंत्री, अमरावती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button