पीक विम्याच्या मुद्द्यावर आमदार नितीन देशमुख अधिकाऱ्यांवर संतापले; विभागीय आयुक्त कार्यालयात जोरदार खडाजंगी!

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करा, अन्यथा सोडणार नाही, असा थेट इशारा; केंद्र आणि राज्य सरकारने विमा कंपनीचा प्रलंबित हिस्सा तातडीने जमा करण्याची मागणी.
अमरावती : शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची मदत मिळाली नसल्याने पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले आहे. पीक विम्याच्या विलंबावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीदरम्यान आमदार नितीन देशमुख आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख, संजय देरकर आणि सिद्धार्थ खरात यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. यावेळी पीक विम्याचा प्रश्न ऐरणीवर आला. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अद्याप मिळाली नसल्याने आमदार नितीन देशमुख यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
राज्य आणि केंद्र सरकारने पीक विमा कंपनीकडे जमा करावयाचा आपला हिस्सा अद्याप दिलेला नसल्यामुळे शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी यावेळी केला. सरकारच्या आर्थिक दिरंगाईचा फटका मात्र प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक मदतीची नितांत गरज असताना पीक विम्याची रक्कम रखडणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत, केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने आपला प्रलंबित हिस्सा विमा कंपनीकडे जमा करावा आणि त्यानंतर कोणताही विलंब न करता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत विम्याची रक्कम वर्ग करावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा द्या, अन्यथा आम्ही सोडणार नाही,’ असा आक्रमक इशाराही आमदार नितीन देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीत वातावरण चांगलेच तापले. आता या आक्रमक भूमिकेनंतर शासन आणि प्रशासन पीक विम्याच्या प्रश्नावर कोणती ठोस पावले उचलते, तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम कधी जमा होते, याकडे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बाईट : नितीन देशमुख, आमदार – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)



