बॉम्बच्या धमकीनंतर अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात कडेकोट बंदोबस्त!

प्रवेशद्वारावर प्रत्येकाची कसून तपासणी; न्यायालय परिसरात पोलिसांकडून विशेष खबरदारी
अमरावती : राज्यातील विविध न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

धमकीच्या ई-मेलनंतर पोलिसांकडून जिल्हा सत्र न्यायालयाच्या संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली होती. दरम्यान, आजही सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. न्यायालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकाची प्रवेशद्वारावर तपासणी केली जात असून, येणाऱ्या-जाणाऱ्यांवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि न्यायालयीन कामकाजाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. बॉम्बच्या धमकीनंतर न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली आहे.



