जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम हवा; विजय वडेट्टीवार यांची मागणी

नागपुरात ओबीसी चळवळीतील १५० प्रमुख व्यक्तींची बैठक; केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी पुढील रणनीती ठरणार
नागपूर प्रतिनिधी : देशात जातनिहाय जनगणनेची चर्चा सुरू असताना, त्यामध्ये इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. या मागणीसाठी देशभरातील ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांमध्ये ओबीसींसाठी काम करणाऱ्या प्रमुख व्यक्तींची बैठक नागपुरातील सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुमारे १५० प्रतिनिधी सहभागी होणार असून, ओबीसींच्या हक्कांसाठी देशव्यापी पातळीवर पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या बैठकीची माहिती देताना सांगितले की, जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असणे अत्यंत आवश्यक आहे. या मागणीसाठी राज्यभरात आणि देशभरात कोणती भूमिका घ्यायची, तसेच केंद्र सरकारवर दबाव कसा निर्माण करायचा, याबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

वडेट्टीवार यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या भूमिकेवर टीका करताना, जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर सरकारने घुमजाव केल्याचा आरोप केला. जातनिहाय जनगणनेचा उल्लेख असला, तरी ओबीसींची स्वतंत्र नोंद करण्यासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. ओबीसींची स्वतंत्र आकडेवारी उपलब्ध होण्यासाठी जनगणनेत स्वतंत्र तरतूद असणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर नागपुरातील ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बैठकीत विविध राज्यांतील ओबीसी चळवळीतील प्रतिनिधींची मते जाणून घेतल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा, जनजागृती आणि सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी कोणती पावले उचलायची, यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आजच्या चर्चेतून ओबीसींच्या स्वतंत्र कॉलमच्या मागणीला देशव्यापी स्वरूप देण्यासाठी ठोस रणनीती निश्चित होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



