citynewsLatest NewsMaharashtraMaharashtra PoliticspoliticsYavatmal

ठाकरे सेनेच्या तालुका प्रमुखासह शिवसैनिकांनी नितेश राणेंच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्या!

मानकिन्ही येथे मच्छीमारांच्या प्रश्नांवरून आंदोलन; कोंबडी चोर, व्होट चोरच्या घोषणा

यवतमाळ | दुर्गेश कान्हु : महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दारव्हा तालुक्यातील मानकिन्ही येथील दौऱ्यादरम्यान ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. राणे तलावाची पाहणी आणि मच्छीमारांशी संवाद साधण्यासाठी आले असताना त्यांच्या ताफ्यासमोर शिवसैनिकांनी कोंबड्या दाखवत घोषणाबाजी केली. यावेळी काही आंदोलकांनी ताफ्यावर कोंबड्या फेकल्याचा प्रकारही घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

दारव्हा तालुका प्रमुख रवी तरटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हातात कोंबड्या आणि विविध फलक घेत राणेंच्या ताफ्याचा निषेध केला. यावेळी कोंबडी चोर, व्होट चोर अशा घोषणा देण्यात आल्या. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे वृत्त आहे.

मच्छीमारांना ठोस मदतीची मागणी

दुष्काळामुळे तलाव आणि जलाशयांमधील पाणीसाठा कमी झाल्याने मत्स्यव्यवसायावर परिणाम झाला असल्याचा दावा आंदोलकांनी केला. केवळ पाहणी दौरे न करता मच्छीमार, मत्स्यपालन करणारे शेतकरी आणि संबंधित कामगारांना ठोस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

दरम्यान, नितेश राणे यांनी आपल्या दौऱ्यात तलावाची पाहणी करून मच्छीमारांशी संवाद साधला. दुष्काळी परिस्थितीमुळे मत्स्यव्यवसायावर परिणाम झाल्याचे त्यांनी मान्य करत, मच्छीमारांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही दिल्याचे वृत्त आहे. जलाशयांमधील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवण्याबाबतही अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, राणेंच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्याच्या प्रकारामुळे यवतमाळातील राजकीय वातावरण तापले असून, आंदोलनातील घोषणाबाजी आणि मच्छीमारांच्या मागण्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

सिटी न्यूजसाठी दुर्गेश कान्हु, यवतमाळ.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button