एकाच नंबरवर चार ट्रक! नागपुरात बनावट नंबर प्लेटचा पर्दाफाश

वाहन चोरी विरोधी पथकाची कळमना मार्केट परिसरात कारवाई; 55 लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : नागपूरच्या कळमना मार्केट परिसरात वाहन चोरी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत एकाच नंबरच्या बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्या चार ट्रकांचा प्रकार उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. या कारवाईत चार ट्रक, बिस्कीट आणि तांदळाच्या 210 पोत्यांसह तब्बल 55 लाख 10 हजार 172 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12.50 ते पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास कळमना मार्केट परिसरातील पार्किंगमध्ये ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात राजेंद्र सिंग सतनाम सिंग रंधावा, वय 51 वर्षे आणि सुखदेव सिंग राजेंद्र सिंग रंधावा, वय 24 वर्षे, दोघेही नेताजीनगर, कळमना परिसरातील रहिवासी, यांना आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. तर शिवासिंग लक्ष्मण जाधव, रा. रायपूर, छत्तीसगड हा पाहिजे आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
एकाच नंबरच्या चार नंबर प्लेट
पोलिसांच्या माहितीनुसार, एका आयशर ट्रकला MH 40 CT 8683 हा अधिकृत नोंदणी क्रमांक असताना इतर तीन वाहनांनाही याच क्रमांकाच्या बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्याचा आरोप आहे.
ही बनावट नंबर प्लेट तयार करून ती खरी असल्याचे भासवण्यात आली आणि संबंधित वाहने रस्त्यावर चालवली जात असल्याचे पोलिस तपासात आढळल्याचे सांगण्यात आले आहे. या माध्यमातून शासन तसेच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
चार ट्रकांसह 55 लाखांचा मुद्देमाल जप्त
कारवाईदरम्यान पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे.
- आयशर प्रो 1110 मॉडेलचा ट्रक
- आयशर प्रो 1110 मॉडेलचा दुसरा ट्रक
- टाटा 1109 मॉडेलचा ट्रक
- आयशर प्रो 2110 मॉडेलचा ट्रक
- वाहनांमधील पारले जी बिस्कीटचा माल
- तांदळाची 210 पोती
या सर्व जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 55 लाख 10 हजार 172 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 946/2026 दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेतील कलम 318(4), 336(3), 340(2) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम 39/192 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईनंतर जप्त मुद्देमाल आणि संबंधित कागदपत्रे आरोपींसह पुढील कारवाईसाठी कळमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
ही कारवाई वाहन चोरी विरोधी पथक, गुन्हे शाखा नागपूर शहराचे पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान, एकाच नोंदणी क्रमांकाच्या बनावट नंबर प्लेटचा वापर करून वाहने चालवली जात असल्याच्या या प्रकरणाचा पुढील तपास कळमना पोलीस करीत आहेत.



